मालवण : पोलीस दलात तब्बल ३५ वर्षे शिस्तबद्ध, निष्कलंक आणि उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या मालवण तालुक्यातील डांगमोडे गावचे सुपुत्र आणि बृहन्मुंबई गुन्हे शाखेत पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले दीपक अनंत ठाकूर यांना यंदा दुहेरी सन्मान मिळाला आहे. त्यांच्या गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक (गुणवत्ता पूर्ण सेवा) जाहीर झाले असून, ३५ वर्षांच्या अखंड सेवेसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’ देखील त्यांना जाहीर झाले आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून महाराष्ट्रातील पोलीस, कारागृह, अग्निशामक आणि होमगार्ड दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रपती पदक आणि सेवा पदकांमध्ये दीपक ठाकूर यांच्या नावाचा समावेश झाला. या गौरवामुळे डांगमोडे गावासह संपूर्ण मालवण तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
१९९१ पासून मुंबई पोलीस दलात सेवा
एलएलबीपर्यंत शिक्षण घेतलेल्या दीपक ठाकूर यांनी १९९१ मध्ये मुंबई पोलीस दलात प्रवेश केला. गेल्या साडेतीन दशकांच्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी मुंबईतील विविध महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांमध्ये जबाबदारी पार पाडली. जुहू, ओशिवरा आणि कांदिवली पोलीस ठाण्यांमध्ये त्यांनी सेवा बजावली असून, सध्या ते बृहन्मुंबई गुन्हे शाखेत पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
पोलीस दलातील त्यांच्या कर्तव्यनिष्ठ, शिस्तबद्ध आणि गुणवत्तापूर्ण कामाची यापूर्वीही वरिष्ठ पातळीवर दखल घेण्यात आली आहे. २०१० मध्ये त्यांना पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले होते. आता राष्ट्रपती पदक आणि अतिउत्कृष्ट सेवा पदक या दोन प्रतिष्ठेच्या सन्मानांनी त्यांच्या प्रदीर्घ सेवेला आणखी मोठी प्रतिष्ठा मिळाली आहे.
मुंबई पोलीस आयुक्तांकडून कुटुंबीयांसमवेत सत्कार
राष्ट्रपती पदक जाहीर झाल्यानंतर १५ ऑगस्ट रोजी मुंबई पोलीस मुख्यालयात मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या हस्ते दीपक ठाकूर यांचा कुटुंबीयांसह सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय पोलीस सेवेसाठी त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
डांगमोडेच्या मातीतून मुंबईच्या पोलीस दलापर्यंत
डांगमोडे या कोकणातील गावातून आलेल्या दीपक ठाकूर यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर मुंबईसारख्या महानगरातील पोलीस दलात प्रदीर्घ आणि उल्लेखनीय कारकीर्द घडवली. ३५ वर्षांच्या सेवेत मिळालेला अनुभव, कर्तव्याप्रती असलेली निष्ठा आणि सातत्यपूर्ण कामगिरी याची पावती म्हणून राष्ट्रपती पदकाकडे पाहिले जात आहे.
दीपक ठाकूर हे डांगमोडे येथील राजेंद्र ठाकूर आणि नारायण ठाकूर यांचे बंधू आहेत. त्यांना राष्ट्रपती पदक आणि अतिउत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाल्याचे वृत्त समजताच डांगमोडेसह मालवण तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गावच्या मातीतून मुंबईच्या पोलीस दलात दाखल होत ३५ वर्षांची निष्कलंक सेवा… आणि त्यानंतर राष्ट्रपती पदकाचा बहुमान—दीपक ठाकूर यांचा हा प्रवास डांगमोडेच्या तरुणांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे.







