मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाला मोठी चालना देणारा महत्त्वपूर्ण त्रिपक्षीय करार आज मंत्रालय, मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. द इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (IHCL), शिरोडा वेळागर जमीन मालक सहकारी संस्था लिमिटेड आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) यांच्यात हा करार झाला.
या करारामुळे शिरोडा-वेळागर परिसरातील पर्यटन विकासाला गती मिळण्यासोबतच सिंधुदुर्गच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. पर्यटन क्षेत्रातील गुंतवणूक वाढल्याने स्थानिक पातळीवर विविध व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याचा मार्गही मोकळा होणार आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक युवकांसाठी कौशल्य विकास आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रातील आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण मिळाल्याने स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
सिंधुदुर्ग हा निसर्गसौंदर्य, समुद्रकिनारे, ऐतिहासिक वारसा आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांसाठी ओळखला जातो. त्यामुळे शिरोडा-वेळागर येथील पर्यटन विकासामुळे जिल्ह्याच्या पर्यटन क्षमतेला आणखी व्यापक व्यासपीठ मिळण्याची अपेक्षा आहे.
या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री नितेश राणे, मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
या त्रिपक्षीय करारामुळे सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासासोबतच स्थानिक रोजगार, कौशल्य विकास आणि आर्थिक प्रगतीला चालना मिळणार असल्याने हा जिल्ह्यासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.






