शाब्दिक वादातून लागली ८ लाखांची पैज; पहाटे साडेतीनला चौघांनी अट केली पूर्ण
कणकवली (प्रतिनिधी) : एखाद्या आव्हानातून पैज लागते आणि पैज जिंकण्यासाठी माणूस काहीही करायला तयार होतो… पण तब्बल ८ लाख रुपयांची रक्कम माफ करून घेण्यासाठी चौघांनी रात्रीच्या अंधारात कणकवली ते कुडाळ पायी गाठल्याची घटना सध्या कणकवली शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.
व्याजाच्या पैशांच्या व्यवहारातून सुरू झालेल्या शाब्दिक वादाला अचानक पैजेचं स्वरूप आलं. समोर ठेवण्यात आलेलं आव्हान स्वीकारत चौघांनी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास कणकवलीहून कुडाळच्या दिशेने पायी कूच केलं. पहाटे साडेतीनच्या सुमारास आरएसएन हॉटेल चौक गाठत त्यांनी पैजेची अट पूर्ण केल्याची माहिती आहे.
पैजेची अटच भन्नाट!
मिळालेल्या माहितीनुसार, कणकवलीतील चार जणांचा एका व्यक्तीसोबत व्याजाच्या पैशांवरून व्यवहार सुरू होता. संबंधित रक्कम परत करण्याबाबत चर्चा होत असताना, एवढी मोठी रक्कम तत्काळ देणे शक्य नसल्याचे चौघांनी सांगितले.
यातूनच त्यांच्या क्षमतेवरून शाब्दिक वाद सुरू झाला.
“तुम्ही एवढेही करू शकत नाही,” अशा आव्हानातून अखेर थेट पैज लागली.
अट ठरली —
कणकवली ते कुडाळमधील आरएसएन हॉटेल चौकापर्यंत पायी जायचं.
मध्ये कुठेही थांबायचं नाही… बसायचं नाही… वाहनाचा वापर करायचा नाही…
आणि ही अट पूर्ण केली तर तब्बल ८ लाख रुपयांची रक्कम माफ!
रात्री अंधारात सुरू झाला प्रवास
पैजेतील नियमांचं पालन होतंय की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी देखरेख करणारे पथकही नेमण्यात आल्याची माहिती आहे.
रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास चौघांनी कणकवलीहून कुडाळच्या दिशेने पायी प्रवास सुरू केला.
सुरुवातीला उत्साह होता. मात्र जसजशी रात्र पुढे सरकत गेली, तसतसा थकवाही वाढत गेला. तरीही आठ लाखांची रक्कम डोळ्यांसमोर ठेवून चौघांनी चालण्याचा वेग कायम ठेवला.
ओरोसपर्यंत पोहोचल्यावर वाढली उत्सुकता
चौघे ओरोसपर्यंत पोहोचल्यानंतर पैज लावणाऱ्या मंडळींची धाकधूक वाढल्याची चर्चा आहे.
यादरम्यान चौघांपैकी एका व्यक्तीला नियम मोडण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न झाल्याचीही चर्चा आहे. मात्र चौघांनी एकी कायम ठेवली आणि पैज कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचा निर्धार कायम ठेवला.
पहाटे साडेतीनला विजय!
अखेर रात्रभर चालत चौघांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास कुडाळमधील आरएसएन हॉटेलचा चौक गाठला.
कणकवली ते कुडाळचा हा पायी प्रवास पूर्ण करताच पैजेची अट पूर्ण झाली. त्यानुसार ८ लाख रुपयांची रक्कम माफ झाल्याची माहिती आहे.
व्याजाच्या व्यवहारातून सुरू झालेला वाद… त्यातून उभं राहिलेलं आव्हान… आणि त्या आव्हानासाठी रात्रभर केलेला पायी प्रवास…
पैज होती आठ लाखांची; पण ती जिंकण्यासाठी चौघांनी तब्बल एक रात्र पायपीट केली! त्यामुळे कणकवलीतील या अनोख्या पैजेची चर्चा सध्या शहरात चांगलीच रंगली आहे.







