सावंतवाडी (प्रतिनिधी) :
सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील गोसावी घराण्यात नागपंचमीला दीड दिवस नागपूजन करण्याची २०० ते ३०० वर्षांची जुनी परंपरा आजही जपली जात आहे. यंदाही या परंपरेनुसार नागपंचमीच्या दिवशी पाच फणांच्या नागोबाची विधिवत प्रतिष्ठापना करून पूजन करण्यात आले.
श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणून नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. धार्मिक परंपरेसोबतच प्राणिमात्रांविषयी प्रेम, निसर्गसंवर्धन आणि सामाजिक एकोपा यांचा संदेश देणारा सण म्हणूनही नागपंचमीकडे पाहिले जाते. शेतकऱ्यांचा मित्र मानल्या जाणाऱ्या नागाची पूजा करून हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो.
इतर ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी सकाळी नागाची मूर्ती आणून सायंकाळी तिचे विसर्जन केले जाते. मात्र, मळगावच्या गोसावी घराण्यात पाच फणांच्या नागोबाची दीड दिवस पूजा करण्याची आगळी परंपरा आहे. नागपंचमीच्या पूर्वसंध्येला ब्राह्मण भोजन व एकादशीचा कार्यक्रम होतो. यावेळी कुलदेवतेचे पूजन केले जाते.
नागपंचमीच्या दिवशी सकाळी नागाची मूर्ती आणून तिची आकर्षक आरास करण्यात आली. त्यानंतर विधिवत पूजन करून नागोबाला दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखविण्यात आला. दुसऱ्या दिवशी सकाळी आणि दुपारी नागाला करंज्यांचा नैवेद्य दाखविण्यात येतो. त्यानंतर सायंकाळी अळवाच्या पानांमध्ये नागमूर्तीचे विसर्जन केले जाते.
नागपंचमीनिमित्त गोसावी घराण्यातील महिलांचा पारंपरिक ‘ओवसा’ कार्यक्रम तसेच भजन आणि फुगड्यांचे आयोजन करण्यात आले. या पारंपरिक कार्यक्रमांमधून मळगावच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे जतन होत असून, नव्या पिढीलाही या प्रथा आणि संस्कृतीची ओळख करून दिली जात आहे.
दोन ते तीन शतकांची परंपरा… पाच फणांचा नागोबा… आणि दीड दिवसाचे पूजन… अशा आगळ्यावेगळ्या परंपरेमुळे मळगावातील नागपंचमी उत्सवाला विशेष सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे.






