मालवण | प्रतिनिधी
कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ संचलित स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागातर्फे ‘नशामुक्त युवा – विकसित भारत’ अभियानांतर्गत विविध जनजागृती उपक्रम उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करण्याबरोबरच निरोगी आणि जबाबदार जीवनशैलीचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
अभियानाच्या प्रारंभी ३१ जुलै २०२६ रोजी महाविद्यालय परिसरात ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ जनजागृती स्वाक्षरी अभियान आयोजित करण्यात आले. अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यासाठी आकर्षक संदेश आणि चित्रांनी सजविलेला विशेष फलक उभारण्यात आला होता. या फलकावर विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वाक्षऱ्या करून नशामुक्त समाज घडविण्याचा निर्धार व्यक्त केला. या अभियानात एकूण ८३ जणांनी सहभाग नोंदविला.
त्यानंतर २ ऑगस्ट रोजी महाविद्यालयाच्या टी.वाय.बी.कॉम. स्मार्ट क्लासरूममध्ये ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियान’ या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात एनएसएस स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. यावेळी भारताच्या पंतप्रधानांनी युवकांना संबोधित करत नशामुक्त जीवनशैलीचा स्वीकार करण्याचे आणि विकसित भारताच्या उभारणीत सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले.
थेट प्रक्षेपणानंतर प्रभारी प्राचार्य कैलास राबते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत व्यसनमुक्ती, स्वअनुशासन आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित केले. व्यसनांपासून दूर राहून समाजात जनजागृती करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यानंतर उपस्थित सर्वांनी ‘नशामुक्त युवा शपथ’ घेऊन व्यसनमुक्त भारताच्या निर्मितीसाठी कार्य करण्याचा संकल्प केला.
या अभियानाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने डॉ. सुमेधा नाईक, डॉ. संकेत बेळेकर, प्रा. योगिता सावंत, प्रा. अनघा टिकले, गौतम मानवर, रिद्धी काजरेकर आणि अपूर्वा पालव यांनी केले. कार्यक्रमाला प्रा. मंदार मुंडले तसेच मालवण नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.







