मालवण | प्रतिनिधी
कोकणातील नारळी पौर्णिमेनिमित्त शतकानुशतके जपली गेलेली ‘नारळ लढवणे’ ही पारंपरिक लोकपरंपरा महाराष्ट्राच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाचा दर्जा देऊन तिला राज्य शासनाची अधिकृत मान्यता मिळावी, अशी मागणी मालवण नगरपरिषदेचे स्वीकृत नगरसेवक तथा भाजपचे रविकिरण चिंतामणी तोरसकर यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीसाठी भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनीही पाठपुरावा सुरू केला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील विविध कोळीवाड्यांमध्ये नारळी पौर्णिमेच्या दिवशी ‘नारळ लढवणे’ ही पारंपरिक स्पर्धा अनेक शतकांपासून उत्साहात साजरी केली जाते. हा केवळ मनोरंजनाचा प्रकार नसून कोकणच्या लोकजीवनाशी, परंपरेशी आणि सांस्कृतिक अस्मितेशी जोडलेला महत्त्वाचा वारसा आहे. योग्य नारळाची निवड, अचूक निशाणा आणि विशिष्ट तंत्राने नारळ लढवण्याचे कौशल्य ही या परंपरेची वैशिष्ट्ये असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
सध्या या परंपरेला युवक आणि पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून महिलांसाठीही स्वतंत्र नारळ लढवण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. त्यामुळे या लोकपरंपरेचे जतन, संवर्धन आणि राष्ट्रीय तसेच जागतिक स्तरावर प्रभावीपणे प्रचार-प्रसार करण्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या परंपरेला राज्य शासनाची अधिकृत मान्यता मिळाल्यास तिचे शासकीय संरक्षण होईल, पर्यटनाला चालना मिळेल तसेच राज्यस्तरीय स्पर्धांमुळे युवक आणि महिलांमध्ये या कौशल्याधारित पारंपरिक खेळाविषयी अधिक आकर्षण निर्माण होईल, असा विश्वास रविकिरण तोरसकर यांनी व्यक्त केला आहे.
यासोबतच ‘नारळ लढवणे’ या ऐतिहासिक लोकपरंपरेचा राज्य शासनाच्या सांस्कृतिक व पर्यटन दिनदर्शिकेत समावेश करून आवश्यक ते शासकीय प्रोत्साहन द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती सिंधुदुर्गचे पालकमंत्री, कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे तसेच भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनाही पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.






