मालवण | प्रतिनिधी
कोकणचा महाउत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेश चतुर्थीला अवघा एक महिना शिल्लक राहिल्याने मालवणसह सिंधुदुर्गातील गणेश चित्रशाळांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गणेशभक्तांच्या आवडीनुसार विविध आकार, उंची आणि आकर्षक देखाव्याच्या श्रीगणेश मूर्ती साकारण्यात मूर्तिकार आणि त्यांचे सहकारी दिवस-रात्र व्यस्त आहेत. मात्र, यंदा शाडू माती आणि रंगांच्या किमतीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाल्याने त्याचा परिणाम गणेशमूर्तींच्या दरावरही होणार आहे.
कोकणातील गणेशोत्सव हा श्रद्धा, परंपरा आणि कलेचा अनोखा संगम मानला जातो. पिढ्यान्पिढ्या जोपासलेली मूर्तीकलेची परंपरा आजही येथील मूर्तिकार तितक्याच समर्पणाने पुढे नेत आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती उपलब्ध असल्या तरी कोकणात पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्तींनाच आजही सर्वाधिक पसंती मिळत आहे.
गणेशोत्सव जवळ आल्याने गणेश चित्रशाळांमध्ये मोठी लगबग सुरू आहे. अनेक गणेशभक्त आपल्या पसंतीच्या मूर्तींची निवड करत असून काहीजण स्वतःच्या संकल्पनेनुसार मूर्ती बनविण्याची ऑर्डर देत आहेत. त्या अनुरूप मूर्ती घडविण्यासाठी मूर्तिकार आपले कौशल्य पणाला लावत आहेत. गणरायाच्या सेवाभावातून आणि भक्तीभावाने मूर्तिकार प्रत्येक मूर्तीला आकर्षक रूप देण्यासाठी मेहनत घेत आहेत.
यंदा मूर्ती बनविण्यासाठी लागणाऱ्या शाडू मातीच्या किमतीत सुमारे २० टक्के, तर रंगांच्या दरात २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. त्यामुळे मूर्तींच्या किमतीतही काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. शाडूच्या मूर्तींना सर्वाधिक मागणी असून काही गणेशभक्त पीओपीच्या मूर्तींचीही मागणी करत आहेत. उंदीर, मोर, शंख यांच्यावर विराजमान गणराय, तसेच दत्त, स्वामी समर्थ यांच्यासह विविध संकल्पनांवरील गणेशमूर्ती घडविण्याच्या ऑर्डर्सही चित्रशाळांमध्ये येत आहेत.
विशेष म्हणजे, यंदा मूर्तीकाम आणि रंगकामासाठी अनेक तरुण-तरुणी मूर्तिकारांना सहकार्य करत आहेत. आधुनिक युगात पारंपरिक मूर्तीकलेचे संवर्धन व्हावे आणि ही कला पुढील पिढीपर्यंत पोहोचावी, यासाठी युवक-युवतींनी या कलेत अधिकाधिक सहभाग घेणे आवश्यक असल्याचे मत मूर्तिकारांनी व्यक्त केले.







