मालवण | प्रतिनिधी
महाराष्ट्राचे राज्यपाल आणि कृषिमंत्र्यांच्या हस्ते हापूस आंबा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘सर्वोच्च उद्यान पंडित’ पुरस्काराने सन्मानित झालेल्या आबा फोंडेकर आणि उत्तम फोंडेकर यांचा सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे (सामान्य प्रशासन), आरती देसाई (इमारत व दळणवळण) आणि शारदा पोवार (भूसंपादन व पाटबंधारे) यांनी मालवण येथील कुंभारमाठ येथे फोंडेकर यांच्या निवासस्थानी भेट देत पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. तसेच कृषी क्षेत्रातील त्यांच्या कार्याबद्दल कौतुक व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी फोंडेकर यांना प्राप्त झालेले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच विविध मंत्र्यांकडून मिळालेली अभिनंदनपत्रे आणि पुरस्कारांची पाहणी केली. आबा फोंडेकर आणि त्यांचे पुत्र संदीप व उत्तम फोंडेकर यांनी आधुनिक तंत्रज्ञान, सातत्यपूर्ण परिश्रम आणि संघर्षाच्या बळावर हापूस आंबा उत्पादनात केलेली उल्लेखनीय कामगिरी जाणून घेत अधिकाऱ्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.
राज्यातच नव्हे तर जागतिक स्तरावर सलग पाच वेळा हंगामातील पहिली हापूस आंब्याची पेटी पाठविण्याचा मान मिळवणाऱ्या फोंडेकर कुटुंबाचे कार्य हे सिंधुदुर्गच्या कृषी परंपरेचा अभिमान असल्याचे गौरवोद्गार यावेळी अधिकाऱ्यांनी काढले.
या सन्मानाबद्दल उत्तम फोंडेकर यांनी जिल्हा प्रशासनाचे आभार मानले. उपजिल्हाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घरी येऊन शुभेच्छा दिल्याने आनंद झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी सौ. प्रत्युषा फोंडेकर, आबा फोंडेकर, त्यांच्या मातोश्री, वहिनी तसेच पुतणी आर्या उपस्थित होत्या.






