मुंबई
फ्लेवरचा वापर, दिशाभूल करणारी लेबलिंग आणि वयाच्या दाव्यांशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय अन्नसुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) अनेक मद्य उत्पादकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या प्रकरणात महाराष्ट्रातील सहा मद्य उत्पादक कंपन्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, या कंपन्या ओल्ड मंक, मॅकडोवेल्स, बॅगपायपर, अँटिक्विटी ब्लू आणि रॉयल चॅलेंज या लोकप्रिय ब्रँडसाठी मद्यनिर्मिती करतात.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, एफएसएसएआयच्या नियमांनुसार तांत्रिकदृष्ट्या वैध आणि नियमसंगत फ्लेवरिंग घटकांचा वापर करण्यास परवानगी आहे. मात्र, काही कंपन्या तयार मद्यामध्ये बाहेरून फ्लेवर मिसळून ते ‘स्टँडर्ड अल्कोहोलिक ड्रिंक’ म्हणून विक्री करत असल्याचे तपासात आढळले.
याशिवाय संबंधित मद्याच्या बाटल्यांवरील लेबलवर फ्लेवर किंवा मिश्रणाची आवश्यक माहिती नमूद करण्यात आली नव्हती. त्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचे तसेच अशा उत्पादनांना मानक श्रेणीतील मद्य म्हणून चुकीच्या पद्धतीने बाजारात विकले जात असल्याचे एफएसएसएआयने स्पष्ट केले आहे.
या प्रकरणात महाराष्ट्रातील सहा कंपन्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, गोव्यातील मॅंडेक्सी डिस्टिलरीज अँड ब्रुअरीज येथेही तपास आणि नमुना संकलन करण्यात आले आहे.
दरम्यान, ही कारवाई संपूर्ण मद्य उद्योगाविरोधात नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. अनेक उत्पादक एफएसएसएआयच्या निर्धारित मानकांचे पालन करून दर्जेदार आणि मानकांनुसार मद्यनिर्मिती करत असल्याचेही मंत्रालयाने नमूद केले आहे.







