मोफत नेत्रतपासणी, चष्मे वाटप व रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ६६ जणांचे रक्तदान, १५५ जणांची नेत्रतपासणी
मालवण : प्रतिनिधी
मालवण नगरपरिषदेचे बांधकाम सभापती तथा लायन्स क्लब ऑफ मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांचा ६० वा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत विविध आरोग्यसेवा उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त राजकोट मित्रमंडळ आणि लायन्स क्लब ऑफ मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने दैवज्ञ भवन, मालवण येथे आयोजित मोफत नेत्रतपासणी, चष्मे वाटप व रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिराचे उद्घाटन मालवणच्या नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. रक्तदान शिबिरासाठी जिल्हा रक्तपेढी, ओरोस यांचे तर नेत्रतपासणीसाठी विवेकानंद नेत्रालय आणि रेटीना सेंटर, कणकवली यांचे सहकार्य लाभले.
या उपक्रमांतर्गत ६६ जणांनी रक्तदान केले, तर १५५ नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात आली. तपासणीनंतर ७२ जण चष्मा वाटपासाठी पात्र ठरले असून त्यांना लवकरच चष्म्यांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या उपक्रमाला नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, नगरसेवक सुदेश आचरेकर, महेश कांदळगावकर, आरोग्य सभापती तथा लायन्स क्लबच्या सचिव पूनम चव्हाण, महिला व बालकल्याण उपसभापती अश्विनी कांदळकर, नगरसेविका मेघा सावंत, लायन्स क्लबच्या खजिनदार राधिका मोंडकर, उमेश नेरुरकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकोट मित्रमंडळ व लायन्स क्लब ऑफ मालवणचे पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छा स्वीकारण्याऐवजी समाजोपयोगी आरोग्यसेवा उपक्रमांचे आयोजन करून सहदेव बापर्डेकर यांनी सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.






