मालवण | प्रतिनिधी
महावितरण, ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा मालवण आणि वीज ग्राहक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ऊर्जा मित्र बैठक’ राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. उपविभागीय कार्यालय, मालवण येथे पार पडली. बैठकीत वीज ग्राहकांच्या तक्रारी, प्रलंबित कामे आणि वीजपुरवठ्याशी संबंधित विविध प्रश्नांवर समन्वयाने चर्चा करून त्यांचे निवारण करण्यावर भर देण्यात आला.
दर महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी आयोजित करण्यात येणाऱ्या या बैठकीत ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा मालवणच्या वतीने मे २०२६ ते जुलै २०२६ या कालावधीत मालवण परिसरात किती वेळा आणि किती कालावधीसाठी वीजपुरवठा खंडित राहिला, याची सविस्तर माहिती देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. हे निवेदन उपकार्यकारी अभियंता सचिन म्हेत्रे यांना देण्यात आले. याबाबत आवश्यक माहिती लवकरच उपलब्ध करून दिली जाईल, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, कुंभारमाठ हुतात्मा स्मारक परिसरातील ट्रान्सफॉर्मर मंजूर होऊनही संबंधित काम अद्याप अपूर्ण असल्याची बाब तक्रारदार ग्राहकांनी बैठकीत मांडली. हे काम तातडीने पूर्ण करून परिसरातील वीजपुरवठ्याच्या समस्या दूर कराव्यात, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.
बैठकीत ग्राहकांच्या विविध तक्रारी आणि सूचना ऐकून त्यांचे टप्प्याटप्प्याने निराकरण करण्याचे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले. ग्राहक आणि महावितरण यांच्यात समन्वय वाढवून वीजसेवा अधिक सक्षम करण्यासाठी अशा बैठका उपयुक्त ठरत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
यावेळी उपकार्यकारी अभियंता सचिन म्हेत्रे, ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा मालवणचे अध्यक्ष श्रीकांत वेंगुर्लेकर, उपाध्यक्ष प्रताप बागवे, संघटक नितीन वाळके, सहसंघटक महेश काळसेकर, सचिव निळकंठ मालणकर, जिल्हा सदस्य प्रमोद मोहिते, सल्लागार रत्नाकर कोळंबकर तसेच वीज ग्राहक पुष्कराज तायशेटे, सदाशिव आरोलकर, रविंद्र धुरी, सचिन गवंडे आदी उपस्थित होते.







