मालवण | प्रतिनिधी
“आजचे जग झपाट्याने बदलत असून उद्याची नोकरी आज अस्तित्वात असेलच याची खात्री नाही. त्यामुळे पारंपरिक शिक्षणाबरोबरच विविध कौशल्ये आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांमधील उद्योजकीय गुणांना योग्य दिशा दिल्यास उद्योजक घडविता येतो,” असे प्रतिपादन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे माजी उपसंचालक सुनील देसाई यांनी केले.
मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी मुख्याध्यापक आर. डी. बनसोडे, मल्टी स्कील फाउंडेशन कोर्सचे समन्वयक संदीप अवसरे, निदेशक केशव भोगले, जगन्नाथ आंगणे आणि नेहा गवंडी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना देसाई यांनी भंडारी हायस्कूलने सन २००७ पासून विद्यार्थ्यांसाठी मल्टी स्कील फाउंडेशन कोर्स सुरू करून दूरदृष्टीचा आणि स्तुत्य उपक्रम राबविल्याचे सांगितले. बदलत्या काळातील रोजगाराच्या संधी लक्षात घेता विद्यार्थ्यांनी एका शिक्षणापुरते मर्यादित न राहता विविध कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक आर. डी. बनसोडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. निदेशक केशव भोगले यांनी प्रास्ताविकातून मल्टी स्कील शिक्षणाचे महत्त्व विशद केले, तर नेहा गवंडी यांनी जागतिक युवा कौशल्य दिनाच्या उद्देशावर प्रकाश टाकला.
यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थांचे, विविध उपकरणांचे, पोस्टर्सचे तसेच टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन सुनील देसाई यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि कौशल्याचे त्यांनी विशेष कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने कॅटरिंग, इलेक्ट्रिशियन, होम सायन्स आणि इतर कौशल्याधारित अभ्यासक्रमांमधून स्थानिक युवकांना उद्योजकतेच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात. नोकरी शोधणारे नव्हे तर रोजगार निर्माण करणारे उद्योजक घडविण्याची ताकद या मल्टी स्कील फाउंडेशन कोर्समध्ये असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात सुनील देसाई यांचा मुख्याध्यापक आर. डी. बनसोडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगन्नाथ आंगणे यांनी केले, तर आभारप्रदर्शन कु. अनन्या अवसरे हिने केले.







