३ डिसेंबर हा जागतिक अपंग, दिव्यांग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. दिव्यांग बांधवांच्या न्यायहक्क आणि सक्षमीकरणासाठी जागृती करण्याच्या उद्देशाने मालवणमधील बॅरिस्टर नाथ पै सेवांगण येथे जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्यानं भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
हा उपक्रम महात्मा गांधी सेवा संघ संचालित साईकृपा अपंग सेवा शिक्षण संस्था कसाल, सिंधुदुर्ग जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, नाथ पै सेवांगण आणि मातृत्व आधार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. कार्यक्रमाला सुमारे १५० दिव्यांग बांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. रवींद्र खेबुडकर, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे, समाजकल्याण अधिकारी श्री. कोळंबे, मालवण प्रभारी तहसीलदार सौ. प्रिया हर्णे, परब मॅडम, गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, साईकृपा संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे तसेच मातृत्व आधार फाउंडेशनचे सेक्रेटरी दादा वेंगुर्लेकर व्यासपीठावर उपस्थित होते.
समाजकार्य करताना दिव्यांग बांधवांना जाणवणाऱ्या अडचणी, व्यथा आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक असणारी प्रशासन व समाजाची जबाबदारी, याबाबत शिंगाडे आणि मातृत्व फाउंडेशनच्या संस्थापकांनी मनोगत व्यक्त केले. दिव्यांग बांधवांसाठी शासनस्तरावर अधिक प्रयत्न व्हावेत, सतत सहकार्य मिळावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
कार्यक्रमात दोन दिव्यांग बांधवांना तहसीलदार मॅडम यांच्या उपस्थितीत व्हीलचेअर प्रदान करण्यात आल्या. तसेच विविध सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा साईकृपा सेवा शिक्षण मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.
शेवटी, सर्व उपस्थित दिव्यांग बांधवांना मातृत्व आधार फाउंडेशनतर्फे ब्लँकेट वितरित करण्यात आले. सुमारे १५० बांधवांना या भेट वस्तू देण्यात आल्या.
कार्यक्रमाची सांगता उपस्थितांचे आभार मानून करण्यात आली.







