मालवण (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतीचे ज्ञान मिळावे, श्रमसंस्काराची जाणीव व्हावी आणि माती व शेतकऱ्यांशी असलेले नाते अधिक दृढ व्हावे या उद्देशाने न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आचरा यांच्या वतीने ‘बांधावरची शिवार शाळा’ हा अभिनव उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. इयत्ता अकरावी व बारावी कला शाखेतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होत प्रत्यक्ष भातलागवडीचा अनुभव घेतला.
या उपक्रमासाठी कालावल येथील प्रगतशील शेतकरी उत्तम जगन्नाथ खांबल यांनी आपल्या शेतात भातलागवडीसाठी जागा उपलब्ध करून दिली. विद्यार्थ्यांनी चिखलमय शेतात उतरून भाताची रोपे लावत शेतीतील श्रम, निसर्गाशी असलेले नाते आणि शेतकऱ्यांचे कष्ट प्रत्यक्ष अनुभवले. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि आनंद उपक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले.
उपक्रमादरम्यान रानकवी ना. धों. महानोर आणि कवी विठ्ठल वाघ यांच्या ‘काळ्या मातीत तिफन चालते’ या कवितांचे वाचन कु. स्वरा आचरेकर आणि डॉ. दत्तात्रय जाधव यांनी केले. त्यानंतर डॉ. जाधव यांनी शेतीचे अर्थकारण, अन्नसुरक्षेमध्ये शेतकऱ्यांचे योगदान आणि समाजातील त्यांचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
निसर्गरम्य वातावरणात विद्यार्थ्यांनी शेताच्या बांधावर अल्पोपहाराचा आनंद घेतला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाबाहेरील जीवनानुभव मिळाला असून श्रमाचे महत्त्व आणि शेतीविषयीचा आदरभाव अधिक दृढ झाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
या उपक्रमात श्री. पारिपत्ये एम. व्ही., सौ. भावना मुणगेकर, डॉ. दत्तात्रय जाधव तसेच अन्य शिक्षक सहभागी झाले होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक अंकुश घुटुकडे, संस्थाचालक आणि स्थानिक शाळा समिती सदस्य यांचे मार्गदर्शन लाभले. ‘बांधावरची शिवार शाळा’ हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय आणि प्रेरणादायी ठरला.






