मालवण (प्रतिनिधी)
कोकणच्या शतकानुशतकांच्या समृद्ध दशावतार परंपरेला योग्य तो राजाश्रय मिळवून देण्याचे ऐतिहासिक काम आमदार निलेश राणे यांनी केल्याची भावना महाराष्ट्र राज्य लोककला अनुदान शिफारस समितीचे सदस्य देवेंद्र नाईक यांनी व्यक्त केली. याबद्दल त्यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, आमदार निलेश राणे आणि शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे विशेष आभार मानले.
पत्रकारांशी बोलताना देवेंद्र नाईक म्हणाले, कोकणातील दशावतार परंपरा टिकवून ठेवण्यासाठी कलाकारांनी अनेक वर्षे अविरत परिश्रम घेतले. रंगमंचावर आम्ही राजाची भूमिका साकारत असलो, तरी प्रत्यक्ष आयुष्यात या कलेला अनेक वर्षे योग्य तो राजाश्रय मिळाला नव्हता. मात्र आमदार निलेश राणे यांनी विधानसभेत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासमोर दशावतार कला आणि कलाकारांचे प्रश्न प्रभावीपणे मांडून शासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर मंत्री शेलार यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याने कलाकारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
देवेंद्र नाईक यांनी सांगितले की, कलाकारांच्या मागण्यांना शासन स्तरावर न्याय मिळवून देण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे दशावतार कलाकारांना मोठा दिलासा मिळाला असून संपूर्ण कलाकार वर्ग त्यांचे आभार व्यक्त करत आहे.
यावेळी त्यांनी दत्ता सामंत यांच्या कार्याचाही विशेष उल्लेख केला. कोरोनासारख्या कठीण काळात अनेक दशावतार कलाकार आर्थिक संकटात सापडले असताना दत्ता सामंत यांनी प्रत्येक कलाकार आणि त्यांच्या कुटुंबाला अन्नधान्यापासून आर्थिक मदतीपर्यंत विविध स्वरूपाची मदत केली. संकटकाळात कलाकारांच्या पाठीशी उभे राहणारे ते खरे आधारवड असल्याच्या भावना कलाकारांनी व्यक्त केल्याचे देवेंद्र नाईक यांनी सांगितले.







