मालवण, प्रतिनिधी : मालवण शहरातील गवंडीवाडा परिसरातील राजा बटाव ते बाळू चव्हाण यांच्या घरासमोरील अंतर्गत रस्त्यावर पावसाचे पाणी साचण्याच्या अनेक वर्षांपासूनच्या समस्येला अखेर दिलासा मिळाला आहे. स्थानिक नगरसेविका शर्वरी पाटकर यांच्या पुढाकाराने आणि मालवण नगरपालिकेच्या सहकार्याने रस्त्यावरील पाण्याचा निचरा सुरळीत करण्यासाठी आवश्यक कामे पूर्ण करण्यात आली.
दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने परिसराला डबक्याचे स्वरूप येत होते. योग्य निचऱ्याची व्यवस्था नसल्याने लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच पादचाऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. या समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी नगरसेविका शर्वरी पाटकर यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता.
तक्रारीची गांभीर्याने दखल घेत नगरसेविका पाटकर यांनी तातडीने मालवण नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संबंधित ठिकाणाची पाहणी करून घेतली. त्यानंतर युद्धपातळीवर काम हाती घेत रस्त्यावर बारीक खडी टाकण्यात आली. त्यामुळे रस्त्याची पातळी सुधारली असून पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होण्यास मदत झाली आहे.
“गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात या रस्त्यावरून ये-जा करणे अत्यंत अवघड झाले होते. नगरसेविका शर्वरी पाटकर यांनी आमची समस्या समजून घेत तातडीने उपाययोजना केल्याने आता रस्ता सुरक्षित आणि वाहतुकीस योग्य झाला आहे,” अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही समस्या निकाली निघाल्याने गवंडीवाडा परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, जनहिताचे हे काम मार्गी लावल्याबद्दल नगरसेविका शर्वरी पाटकर तसेच मालवण नगरपालिकेच्या प्रशासनाचे नागरिकांनी आभार मानले आहेत.







