मालवण, प्रतिनिधी : “सेवाभाव हीच कोणत्याही संस्थेच्या प्रगतीची खरी ताकद आहे. प्रशासनात सेवाभावी वृत्तीने कार्य करणारी व्यक्तिमत्त्वे ही संस्थेचे आधारस्तंभ आणि मार्गदर्शक असतात. त्यांच्या अनुभव, प्रामाणिकपणा आणि बहुमोल सल्ल्यामुळे प्रशासन अधिक गतिमान होत असते. आजच्या काळात अशा सेवाभावी व्यक्तिमत्त्वांची निर्मिती होणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन अजयराज वराडकर यांनी केले.
वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे ज्येष्ठ लिपिक जयवंत भाऊ पेडणेकर यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.
यावेळी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ तसेच वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने जयवंत पेडणेकर आणि त्यांच्या पत्नींचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका देवयानी गावडे यांनी केले. व्यासपीठावर संस्थेचे स्कूल कमिटी चेअरमन सुधीर वराडकर, खजिनदार रविंद्र पावसकर, संचालक महेश वाईरकर, स्वाती वराडकर, वराडकर इंग्लिश मीडियमचे मुख्याध्यापक ऋषी नाईक, साळगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेचे सहायक शिक्षक नार्वेकर सर, बागेवाडी सर, माजी मुख्याध्यापक चंद्रकांत पंडित, लिपिक सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे सचिव सुनील नाईक, सहसचिव एस. डी. गावडे, झाराप पंचक्रोशी साळगावचे माजी अध्यक्ष प्रमोद रविंद्र धुरी, शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, साळगावचे मुख्याध्यापक ताकीलदार, वराडकर कॉलेज कट्टाचे प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी, पर्यवेक्षक महेश भाट, सुप्रिया नाईक, एकनाथ राऊळ, विद्यानंद पिळणकर आणि सुनील पाटकर यांनी समयोचित मनोगते व्यक्त करून जयवंत पेडणेकर यांच्या प्रदीर्घ व निष्ठावान सेवेला उजाळा दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक समीर चांदरकर यांनी केले.
या प्रसंगी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी जयवंत पेडणेकर यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत त्यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव केला.







