मालवण, प्रतिनिधी : मालवण तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी हिवाळे येथील विरेन्द्र दिनेश कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी भानुदास येरागी (तारकर्ली-देवबाग) आणि विठ्ठल धुरी (पारवाडी-आचरा) यांची निवड करण्यात आली.
मालवण येथील अथर्व मंगल कार्यालयात तालुक्यातील पोलीस पाटीलांची सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. या बैठकीत पुढील एक वर्षासाठी संघटनेची नवीन तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली. बैठकीला तालुक्यातील ७२ पोलीस पाटील उपस्थित होते.
नवीन कार्यकारिणीत सचिवपदी सिताराम नागेश सकपाळ (त्रिंबक), सहसचिवपदी नितेश कुणकवळेकर (कुणकवळे) आणि जगन्नाथ जोशी (गाउडवाडी-आचरा), खजिनदारपदी समीक्षा सतीश सुकाळी (कर्लाचाव्हाळ), सहखजिनदारपदी आशिष आपटे (मोगरणे) आणि सचिन आचरेकर (भगवंतगड) यांची निवड करण्यात आली. तसेच सल्लागारपदी शीतल उदय परब (कांदळगाव) आणि संतोष गोविंद जामसंडेकर (तिरवडे) यांची निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थित पोलीस पाटीलांनी अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. संघटनेच्या माध्यमातून पोलीस पाटलांच्या विविध प्रश्नांना प्रभावीपणे शासन आणि प्रशासनापुढे मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.







