मालवण, दि. (प्रतिनिधी) : प्रत्येक वृक्षामध्ये औषधी गुणधर्म दडलेले असून त्याची योग्य माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. प्रत्येक नागरिक कृषी साक्षर झाला आणि वृक्षांचे महत्त्व जाणून घेतले, तर पर्यावरण संवर्धन होण्यासाठी वेळ लागणार नाही. यासाठी कृषीविषयक पुस्तकांचे वाचन प्रत्येकाने करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन साहित्यिक सुरेश ठाकूर यांनी केले.
आचरा येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनमंदिर आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या वर्षा सांबारी, संस्थेचे उपाध्यक्ष अशोक कांबळी, कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, वैशाली सांबारी, भिकाजी कदम, वनराई व एचडीएफसी परिवर्तन संस्थेच्या गौरी मायनाक, शिवराम म्हापणकर, मांगिरीष सांबारी, रामेश्वर वाचनमंदिर सांस्कृतिक समिती सदस्या श्रद्धा महाजनी, ग्रंथपाल विनिता कांबळी, महेश बापर्डेकर, समृद्धी मेस्त्री, स्वप्नील चव्हाण यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना सुरेश ठाकूर यांनी रामेश्वर सार्वजनिक वाचनमंदिरात उपलब्ध असलेल्या ५०० हून अधिक कृषीविषयक पुस्तकांपैकी दहा महत्त्वाच्या पुस्तकांची माहिती उपस्थितांना दिली. या पुस्तकांमधून शेती, वृक्षसंवर्धन, औषधी वनस्पती आणि पर्यावरण संरक्षणाबाबत उपयुक्त ज्ञान मिळू शकते, असे त्यांनी सांगितले. कृषीविषयक साहित्याचे नियमित वाचन करून प्रत्येकाने कृषी साक्षर होण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी वनराई आणि एचडीएफसी परिवर्तन संस्थेच्या गौरी मायनाक यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती देताना, गावागावांत कृषी साक्षरता आणि उद्योग साक्षरता निर्माण करण्यासाठी संस्था कार्यरत असल्याचे सांगितले. या उपक्रमांचा लाभ अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. तसेच वृक्षसंवर्धनाबरोबरच कृषीविषयक ज्ञानाचा प्रसार ही काळाची गरज असल्याचा सूर उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.







