मालवण, दि. (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) आणि राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आचरा येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या ग्रामीण सर्वसाधारण गटात प्रशालेचे चार विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले. यामध्ये कु. गौरी रत्नाकर उदगिरे हिने मालवण तालुक्यात प्रथम क्रमांक, कु. नुर्वी गिरीश शेटगे हिने सातवा क्रमांक, कु. कौशल माधवराव भोसले याने सोळावा क्रमांक, तर कु. लक्ष गोपाळ वाडेकर याने विसावा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश मिळविले.
तसेच राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेत कु. वैष्णवी शंकर पेडणेकर आणि कु. स्वरा नित्यानंद तळवडकर या विद्यार्थिनी शिष्यवृत्तीधारक ठरल्या आहेत.
या यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक अंकुश घुटुकडे, उपमुख्याध्यापिका सौ. मधुरा माणगांवकर तसेच शिक्षक राजम, साटेलकर, सौ. फर्नांडिस, शेलार आणि राठोड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी अभिनंदन करून त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.







