मालवण, प्रतिनिधी : मालवण शहरातील दांडी स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या रानगवतामुळे स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच परिसरातील वीज वितरणाच्या डीपीभोवती दाट झाडी वाढल्याने वीज दुरुस्तीच्या कामातही अडथळे येत होते. याची दखल घेत शिवसेना (ठाकरे) गटाचे नगरसेवक मंदार ओरसकर यांच्या पुढाकारातून परिसराची साफसफाई करण्यात आली.
दांडी स्मशानभूमी तसेच डीपी परिसरातील वाढलेले रानगवत आणि झुडपे हटविण्यात आली. त्यामुळे स्मशानभूमी परिसर स्वच्छ आणि मोकळा झाला असून, वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर दुरुस्तीचे काम करणाऱ्या वायरमनना आता कोणताही अडथळा येणार नाही.
स्थानिकांच्या मागणीनुसार ही साफसफाई तातडीने करण्यात आली. यामुळे वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांना काम करणे अधिक सोयीचे झाले असून, आपत्कालीन परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी लागणारा वेळही कमी होण्यास मदत होणार आहे.
या स्वच्छता मोहिमेत रोशन कांबळी, बबन वाघ यांच्यासह स्थानिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत नियमित स्वच्छता राखण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.







