मालवण दि प्रतिनिधी
पाच वर्षापूर्वी घरगुती वादातून महिलेला धक्काबुक्की आणि शिवीगाळ करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या विजय घाडीगावकर, सौ. अस्मिता विजय घाडीगावकर, अनिकेत घाडीगावकर या तिघांची ओरोस येथील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. याप्रकरणी आरोपिंच्यावतीने अॅड. उल्हास कुळकर्णी, अॅड प्राची कुळकर्णी, अॅड अमेय कुळकर्णी यांनी काम पाहीले.
दि १० ऑगस्ट २०२१ रोजी फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार घरगुती वादातून विजय घाडीगावकर, सौ. अस्मिता विजय घाडीगावकर, अनिकेत घाडीगावकर यांनी एकमेकांचे संगनमताने व सहाय्याने फिर्यादी महिला तीच्या राहत्या घरी झोपली असताना तिला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच महिलेला ढकलाबुकल करुन शिवीगाळी केली व ठार मारण्याची धमकी दिली अशी फिर्याद सदर महिलेने दिली होती. त्यानुसार पोलिसांनी आरोपीं विरुध्द भादवि कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६ सह ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपींना ११ऑगस्ट २०२१ रोजी अटक केली होती . त्यानंतर आरोपींची जामीनावर मुक्तता झालेली होती. त्यानंतर ओरोस येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सिंधुदुर्ग यांच्यासमोर सुनावणी होऊन संशयाच्या पलीकडे जाऊन फिर्यादी पक्षाला गुन्हा शाबित करता आला नाही तसेच सरकारी पक्षातर्फे सादर करण्यात आलेल्या पुराव्यातील त्रुटी, विसंगती यांचा विचार करता न्यायालयाने सर्व गुन्ह्यातून तिन्ही आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे . याकामी आरोपी तर्फे अॅड. उल्हास कुळकर्णी, अॅड प्राची कुळकर्णी, अॅड अमेय कुळकर्णी यांनी काम पाहीले.







