मालवण (प्रतिनिधी) : चिंदर गावातील विकासकामांच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांची जोरदार लढत रंगली आहे. भाजपचे पंचायत समिती सदस्य तथा गटनेते दीपक सुर्वे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यावर टीका करत, “दत्ता सामंत यांनी चिंदरमध्ये स्वखर्चातून १४ विकासकामे केली असतील तर मी पंचायत समिती गटनेतेपदाचा राजीनामा देण्यास तयार आहे. अन्यथा त्यांनी शिवसेना जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा,” असे खुले आव्हान दिले होते.
या आव्हानाला शिवसेना विभागप्रमुख संतोष कोदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून दत्ता सामंत यांनी चिंदर गावात १४ नव्हे तर प्रगतीपथावरील दोन कामांसह एकूण १६ विकासकामे पूर्ण केल्याचा दावा करत कोदे यांनी या कामांची सविस्तर यादीच प्रसिद्ध केली आहे.
कोदे म्हणाले, “चिंदर गावातील वाडी-वस्त्यांवरील जनतेच्या गरजा आणि मागण्या लक्षात घेऊन रस्ते, स्मशानभूमी, गणेश घाट, पार बांधकाम तसेच अन्य मूलभूत सुविधांची कामे करण्यात आली आहेत. यामुळे गावात विकासाचा झंझावात निर्माण झाला आहे. मात्र गावासाठी काहीही न करणारे दीपक सुर्वे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत.”
शिवसेनेने प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये चिंदर तेरई रस्ता डांबरीकरण, लब्देवाडी रस्ता काँक्रीटीकरण, लाटमवाडी रस्ता डांबरीकरण, सडेवाडीतील विविध रस्त्यांचे काँक्रीटीकरण, स्मशानशेड बांधकाम, गणेश घाट उभारणी, बागवाडी रस्ता मजबुतीकरण, महापुरुष पार बांधणे तसेच पालकरवाडी-पाटणवाडी येथे एसटी वाहतुकीस अडथळा ठरणारा वीज खांब स्थलांतरित करण्यासह एकूण १६ विकासकामांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.
यावेळी संतोष कोदे यांनी दीपक सुर्वे यांच्यावरही निशाणा साधला. “स्वतःच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी शासनाचा १५ लाख रुपयांचा निधी खर्च करणाऱ्या दीपक सुर्वे यांनी प्रथम त्या निधीचा हिशोब जनतेला द्यावा. विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी जनतेसोबत करावी. गावातील नागरिकच सांगतील की ही कामे कोणी केली. त्यामुळे केवळ गटनेतेपदाचाच नव्हे तर पंचायत समिती सदस्यपदाचाही राजीनामा दीपक सुर्वे यांनी द्यावा,” असे खुले आव्हान कोदे यांनी दिले.
दरम्यान, दीपक सुर्वे यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करत दत्ता सामंत यांच्यावर टीका केली आहे. “खोटे बोला पण रेटून बोला ही दत्ता सामंत यांची राजकीय नीती राहिली आहे. निवडणुका जवळ आल्यामुळेच त्यांना चिंदर गाव आठवले आहे. गावातील काही पाणंद रस्त्यांची कामे झाली असतील, मात्र अनेक कामे निकृष्ट दर्जाची असल्याने ती पुन्हा करावी लागली. करण्यात आलेल्या कामांवर खर्च झालेला निधी हा शासनाच्या विविध योजनांमधून आलेला असून त्याला स्वखर्चातून केलेली कामे म्हणता येणार नाहीत,” असा आरोप सुर्वे यांनी केला.
चिंदर गावातील विकासकामांच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा वाद आता अधिकच तीव्र होण्याची चिन्हे असून, आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या आरोप-प्रत्यारोपांकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.






