मालवण (प्रतिनिधी)
मालवण मधील तबला वादक श्री. सुधीर मच्छिन्द्रनाथ गोसावी यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या विशारद परीक्षेत प्रथम श्रेणीने उत्तीर्ण होत ‘तबला विशारद’ ही पदवी प्राप्त केली आहे.
मूळ काळसे गावचे सुपुत्र असलेले सुधीर गोसावी हे मालवण मधील टोपीवाला हायस्कुलमध्ये शिक्षक म्हणून सेवेत आहेत. प्रथम पखवाज वादक असलेल्या सुधीर गोसावी यांनी कॉलेज जीवनापासून तबला वादनाचे शिक्षण घेतले. मिलिंद हडकर व अरुण केळूसकर यांच्याकडे त्यांनी तबला वादनाचे धडे गिरवले. तसेच मंगेश कदम यांचेही त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. एक उत्कृष्ट तबला वादक म्हणून ओळख असलेल्या श्री. गोसावी यांनी मालवणसह जिल्ह्याच्या संगीत व सांस्कृतिक क्षेत्रात गोसावी यांनी आपल्या तबला वादनाने वेगळी छाप सोडली आहे. तबला विशारद परीक्षेत श्री. गोसावी यांनी ६३१ गुणांसह प्रथम श्रेणी मिळवीत तबला विशारद ही पदवी प्राप्त केली आहे. श्री. गोसावी यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.







