मालवण : मालवण तालुक्यातील चिंदर गावात शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी स्वखर्चातून १४ विकासकामे पूर्ण केल्याचा दावा करण्यात आला असून, त्यावरून स्थानिक राजकारण तापले आहे. एका बाजूला ग्रामस्थांनी विकासकामांसाठी आमदार निलेश राणे आणि दत्ता सामंत यांचे आभार मानले आहेत, तर दुसरीकडे भाजपाचे पंचायत समिती गटनेते दीपक सुर्वे यांनी हा दावा फेटाळत सामंत यांना खुले आव्हान दिले आहे.
शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून दत्ता सामंत यांनी स्वखर्चातून चिंदर गावातील विविध भागांमध्ये १४ विकासकामे पूर्ण केली. यामध्ये लब्देवाडी, साटमवाडी, कुंभारवाडी स्मशान रस्ता, तेरई मुख्य रस्ता ते ब्राम्हणदेव मंदिर, मुळेघर रस्ता, गावठवाडी-बागवाडी रस्ता, गावडेपुरुष मंदिर रस्ता यांसह अनेक रस्त्यांची कामे, पायवाटांचे काँक्रिटीकरण, गणेश घाट, महापुरुष पार बांधणे, स्मशान चौथरा उभारणी तसेच अडथळा ठरणारा वीज खांब हलविण्याची कामे करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या कामांची पाहणी करून दत्ता सामंत यांनी समाधान व्यक्त केले असून ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानल्याचेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
मात्र या दाव्यावर भाजपाचे गटनेते दीपक सुर्वे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. “जर दत्ता सामंत यांनी चिंदर गावात खरोखरच स्वखर्चातून १४ विकासकामे केली असतील, तर मी माझ्या पंचायत समिती गटनेता पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. अन्यथा दत्ता सामंत यांनी शिवसेना जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा,” असे खुले आव्हान सुर्वे यांनी दिले.
सुर्वे यांनी प्रसिद्धीपत्रकातून आरोप केला की, चिंदर गावातील काही पाणंद रस्त्यांची कामे झाली असतील, मात्र १४ विकासकामे स्वखर्चातून पूर्ण केल्याचा दावा दिशाभूल करणारा आहे. निवडणुका जवळ आल्यामुळेच गावाची आठवण झाली असून अनेक कामे निधीतूनच करण्यात आली असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच काही निकृष्ट कामे पुन्हा करावी लागल्याचे सांगत या प्रकरणाची सखोल माहिती योग्य वेळी समोर आणू, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, चिंदरमधील विकासकामांच्या श्रेयावरून शिवसेना आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, हा वाद आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणखी रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.







