मालवण : सागरी पर्यावरण संवर्धन, किनारी भागांचा शाश्वत विकास आणि समुद्र संरक्षणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने “समुद्ररक्षक संमेलन २०२६” चे आयोजन करण्यात आले आहे. सागरशक्ती (Oceans and People), वनशक्ती, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन १३ जून रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.३० या वेळेत दादा शिखरे सभागृह, बॅ. नाथ पै सेवांगण, धुरीवाडा येथे होणार आहे.
या संमेलनात पर्यावरणतज्ज्ञ स्टॅलिन दयानंद (संचालक, वनशक्ती) हे “विनाश की विकास? – प्रश्न कोकणाचा” या विषयावर प्रमुख व्याख्यान देणार आहेत. तसेच सागरी जैवविविधतेचे संरक्षण, प्लास्टिकमुक्त महासागर, स्वच्छ व निरोगी किनारे, हवामान बदलाची आव्हाने, किनारी पर्यावरणाचा ऱ्हास आणि नागरिकांच्या सहभागातून समुद्र संवर्धन यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे.
सिंधुदुर्गची ओळख त्याच्या निसर्गसंपन्न समुद्रकिनाऱ्यांमुळे आणि समृद्ध सागरी जैवविविधतेमुळे आहे. मात्र वाढते समुद्र प्रदूषण, प्लास्टिक कचरा आणि पर्यावरणीय ऱ्हासामुळे समुद्रसंपत्तीसमोर गंभीर आव्हाने निर्माण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर समाजामध्ये व्यापक जनजागृती घडवून आणण्याच्या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
संमेलनातील विषय समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी पत्रकार व प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याने पत्रकार बांधवांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून समुद्र संरक्षणाच्या जनचळवळीला बळ द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. “स्वच्छ समुद्र, सुरक्षित समुद्र, समृद्ध भविष्य” हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.







