- पर्यावरण संवर्धन आणि महिला सन्मानाचा संदेश देत नागरिकांचे लक्ष वेधले
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर; निसर्ग आणि स्त्री संरक्षणाचे आवाहन
- बस स्थानक ते फोवकांडा पिंपळ मार्गावर रॅलीत युवकांचा उत्स्फूर्त सहभाग
- खऱ्या अर्थाने स्वराज्य स्थापनेसाठी समाजाने जागे होण्याची हाक
मालवण : शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून युथ बिट्स फॉर क्लायमेट, वनशक्ती आणि सिंधुकन्या लोकसंचलित साधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण शहरात “मावळे कधी जागे होणार?” ही जनजागृती रॅली उत्साहात पार पडली. मालवण बस स्थानक ते फोवकांडा पिंपळ या मार्गावर काढण्यात आलेल्या या रॅलीने पर्यावरण संवर्धन आणि महिला सन्मानाचा प्रभावी संदेश दिला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे वृक्षांप्रती असलेले प्रेम, पर्यावरण संरक्षणाची भूमिका तसेच स्वराज्यात महिलांना मिळणारा सन्मान आणि संरक्षण याविषयी जनजागृती करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
रॅलीमध्ये महाराजांच्या काळातील सुरक्षित स्त्री आणि आजच्या समाजातील असुरक्षित स्त्री यांमधील विरोधाभास प्रभावीपणे मांडण्यात आला. सध्याच्या काळातील मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श घेत निसर्गाचे रक्षण करावे, महिलांचा सन्मान राखावा आणि खऱ्या अर्थाने स्वराज्याची मूल्ये जपावीत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या उपक्रमात मेगल डिसोझा (अध्यक्षा, युथ बिट्स फॉर क्लायमेट), यथार्थ खवणेकर (प्रकल्प अधिकारी, वनशक्ती), ऐश्वर्य मांजरेकर (अध्यक्ष, वसुंधरा जनकल्याण फाउंडेशन), अमरीश मिस्री (जिल्हा समन्वय अधिकारी, माविम), शैलेश सावंत (उपजीविका सल्लागार, सिंधुकन्या CMRP), रिया घाडी (अध्यक्ष, सिंधुकन्या CMRP), इकोमेट्स ग्रुपच्या स्वाती पारकर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.







