मालवण (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होताच मालवणातही पावसाने दमदार हजेरी लावली. आज रात्री साडेआठ वाजल्यापासून ढगांचा जोरदार गडगडाट, विजांचा लखलखाट आणि मुसळधार पावसाने मालवण शहरासह परिसराला अक्षरशः झोडपून काढले. या पावसामुळे शहरातील जनजीवन काही काळ विस्कळीत झाले.
यंदा मान्सूनच्या आगमनाला काहीसा विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच केरळमध्ये दाखल झालेला मान्सून वेगाने पुढे सरकत आज महाराष्ट्रात पोहोचल्याची घोषणा हवामान विभागाने केली. त्यानंतर दिवसभर मालवणात ढगाळ वातावरण होते. सायंकाळनंतर वातावरणात अचानक बदल होऊन रात्री साडेआठच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांनाही या पावसाचा काही प्रमाणात फटका बसला.
दरम्यान, पर्यटनस्थळांवरही पर्यटकांची मोठी गर्दी असताना अचानक आलेल्या पावसामुळे राजकोट किल्ला आणि रॉक गार्डन येथे फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांचीही तारांबळ उडाली. मान्सूनच्या या पहिल्याच दमदार सरींनी मालवणकरांना पावसाळ्याची जोरदार चाहूल दिली.







