मालवण : (प्रतिनिधी)
कोकणच्या समृद्ध सागरी किनाऱ्यांचे संरक्षण, प्लास्टिकमुक्ती आणि वाढत्या आव्हानांवर मंथन करण्यासाठी दि. १३ जून रोजी मालवण येथे भव्य ‘समुद्ररक्षक संमेलन २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. ‘स्वच्छ समुद्र, सुरक्षित’ समुद्र, समृद्ध भविष्य!” या मुख्य ध्येयावर आधारित हे संमेलन सकाळी ९.३० ते दुपारी १.३० या वेळेत धुरीवाडा येथील बॅ. नाथ पै सेवांगणच्या दादा शिखरे सभागृहात होणार आहे.
या संमेलनाचे आयोजन सागरशक्ती, वनशक्ती, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि बॅ. नाथ पै सेवांगण यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या संमेलनाला कांदळवन कक्ष (महाराष्ट्र वनविभाग), मत्स्य विभाग (महाराष्ट्र शासन), मालवण नगरपरिषद आणि ‘यूथ बिट्स फॉर क्लायमेट” या संस्थांचे सहकार्य लाभले आहे. कोकण किनारपट्टीवरील बदलती परिस्थिती आणि विकास प्रकल्पांमुळे सागरी पर्यावरणावर होणारे परिणामावर चर्चा करणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. ‘वनशक्ती” संस्थेचे संचालक स्टॅलिन दयानंद हे संमेलनादरम्यान ते ‘विनाश की विकास ? प्रश्न कोकणाचा” या ज्वलंत आणि महत्त्वाच्या विषयावर व्याख्यान देणार आहेत. “कोकणच्या शाश्वत विकासाची दिशा कशी असावी आणि निसर्गाचा बळी न देता विकास कसा साधता येईल, याबाबत ते उपस्थितांना मार्गदर्शन करतील.
सागरी परिसंस्थेच्या रक्षणासाठी या संमेलनाद्वारे दुर्मीळ सागरी जीव आणि वनस्पतींचे संवर्धन करणे, समुद्रात वाढणाऱ्या प्लास्टिक प्रदूषणाला आळा घालणे, मालवण व परिसरातील पर्यटन किनाऱ्यांची स्वच्छता राखणे, स्थानिक नागरिक, मच्छीमार आणि युवकांच्या सक्रिय सहभागातून पर्यावरण संवर्धन करणे, या प्रमुख मुद्यांवर जनजागृती व कृती आराखडा तयार केला जाणार आहे. नागरिक, मच्छीमार बांधव, विद्यार्थी आणि युवकांना या संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आयोजकांनी आवाहन केले आहे.







