शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांवर सखोल चर्चा
दुर्गम भागातील शाळांसाठी 9वी-10वीची किमान पटसंख्या 20 करण्याच्या निर्णयाचा विशेष उल्लेख
शिक्षक व मुख्याध्यापकांच्या समस्यांवर सकारात्मक निर्णयांचे आश्वासन
राज्यभरातील मुख्याध्यापक, पदाधिकारी आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ, मुंबई यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय चर्चा व कृतिसत्राला आज आंबोली येथील सिंधुदुर्ग सैनिक स्कूलमध्ये उत्साहात प्रारंभ झाला. पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या थंड हवेच्या ठिकाणी आयोजित या दोन दिवसीय कृतिसत्रास कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या कृतिसत्राचे उद्घाटन आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचे चेअरमन सुनील राऊळ होते. मुख्याध्यापक संघाचे राज्याध्यक्ष तानाजी माने यांनी प्रास्ताविकातून कृतिसत्राची भूमिका स्पष्ट केली.
पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात सहाय्यक शिक्षण संचालक श्रीराम पानझाडे यांनी शिक्षक व मुख्याध्यापकांच्या विविध समस्यांवर मार्गदर्शन केले. शिक्षण क्षेत्रातील नव्या धोरणात्मक बदलांबरोबरच तांत्रिक अडचणी, प्रशासनिक प्रश्न आणि भविष्यातील शैक्षणिक दिशा यावर त्यांनी सविस्तर विवेचन केले. विद्यार्थी, शिक्षक आणि शासन यांचे हित जपत सकारात्मक निर्णय घेतले जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
चर्चासत्रात मार्गदर्शन करताना दुर्गम व डोंगराळ भागातील शाळांसमोरील विद्यार्थी संख्येच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केलेल्या पाठपुराव्याचा विशेष उल्लेख करण्यात आला. कोकणातील मंत्री उदय सामंत आणि नितेश राणे यांच्या सहकार्याने शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या दालनात बैठक घेऊन इयत्ता नववी व दहावीची किमान पटसंख्या 20 करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंजूर करण्यात आला. या निर्णयाचा राज्यातील सुमारे 900 हून अधिक शाळांना लाभ झाल्याचे सांगण्यात आले.
यावेळी श्रीराम पानझाडे यांनी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या कार्याचे कौतुक करताना शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, प्रधान सचिव, शिक्षणमंत्री तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून शिक्षकांच्या समस्या सोडविणारे शिक्षक आमदार म्हणून त्यांची प्रशंसा केली.
कार्यक्रमास मुख्याध्यापक संघाचे सचिव सागर नंदकुमार, उपाध्यक्ष सचिन नलावडे, सुनील घुगरे, सुनील पंडित, माजी अध्यक्ष जे. के. पाटील, विद्या समिती सचिव संजय झांबरे, सुनील भोर, कृतीसत्राचे आयोजक व सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे, जिल्हा सचिव घावरे, माजी अध्यक्ष एम. जी. जी. मातोंडकर, कुसगांवकर यांच्यासह राज्यभरातील मुख्याध्यापक, पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.







