मालवण (प्रतिनिधी)
विधानपरिषदेची निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधीचा आवाज बुलंद करण्यासाठी असते. मात्र घोडेबाजार, राजकीय तडजोडी आणि बिनविरोध निवडीच्या प्रक्रियेमुळे माझ्या सारख्या मतदाराला मतदान करण्याची संधीच मिळाली नाही, त्यामुळे लोकशाहीतील मतदानाचा हक्क हिरावून घेतला गेला, अशी खंत मालवण नगरपालिकेतील उबाठा शिवसेनेचे नगरसेवक तपस्वी मयेकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून व्यक्त केली असून राजकीय सोयीसाठी आणि सत्तेच्या गणितांसाठी मतदानाचा हक्क वारंवार बाजूला सारला जात असल्याची टीका मयेकर यांनी करत याबाबत निषेध व्यक्त केला आहे.
लोकशाहीने प्रत्येक नागरिकाला दिलेला सर्वात मोठा अधिकार म्हणजे मतदानाचा अधिकार आहे. आज तोच अधिकार माझ्यासारख्या अनेक लोकप्रतिनिधींपासून हिरावून घेण्यात आला आहे. मालवण नगरपरिषदेची निवडणूक लढवताना मी माझ्या प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या दारात गेलो. त्यांच्यासमोर माझे विचार, माझे व्हिजन आणि माझी बांधिलकी मांडली. “तुमच्या सुख-दुःखात खांद्याला खांदा लावून उभा राहीन,” हा शब्द दिला. त्यानंतरच १२४६ नागरिकांनी माझ्यावर विश्वास दाखवत मला नगरसेवक म्हणून निवडून दिले. लोकशाहीची खरी ताकद ही निवडीच्या अधिकारात असते. मतदारांना पर्याय असतो, उमेदवारांना आपले विचार मांडण्याची संधी असते आणि त्यानंतर नागरिक निर्णय घेतात. परंतु आज विधानपरिषदेच्या निवडणुकीत हीच प्रक्रिया हरवलेली दिसली, अशी खंत तपस्वी मयेकर यांनी व्यक्त केली.
विधान परिषद ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींचा आवाज बुलंद करण्यासाठी असते. नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि इतर लोकप्रतिनिधींच्या समस्या विधानभवनात पोहोचवण्यासाठी आपण आपला प्रतिनिधी निवडतो. त्यामुळे या निवडणुकीत मला अपेक्षा होती की विविध उमेदवार आमच्यासमोर येतील, आपले विचार मांडतील आणि आम्हाला निवडीची संधी देतील. परंतु घोडेबाजार, राजकीय तडजोडी आणि बिनविरोध निवडीच्या प्रक्रियेमुळे माझ्यासारख्या मतदाराला मतदान करण्याची संधीच मिळाली नाही. यापेक्षाही मोठी खंत म्हणजे बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवाराने एक मतदार म्हणून आम्हाला भेटण्याची, आपले व्हिजन सांगण्याची तसदीही घेतली नाही, अशी टीका तपस्वी मयेकर यांनी केली आहे.
लोकशाहीत निवडून येणे महत्त्वाचे आहेच, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे आपण कोणाच्या मतांवर, कोणाच्या विश्वासावर निवडून येत आहोत याचे भान असणे आवश्यक आहे. लोकशाहीची व्याख्या हि “लोकांचे, लोकांकरिता आणि लोकांद्वारे चालविलेले शासन” अशी असली तरी आजची परिस्थिती पाहता नवी व्याख्या “राजकीय नेत्यांचे, आपल्या मुलांकरिता आणि सर्वपक्षीय राजकीय नेत्यांद्वारे चालविलेले शासन” अशी करावी लागेल. मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नव्हे, तर संविधानाने दिलेल्या अधिकाराचा सन्मान करणारा नागरिक म्हणून या प्रक्रियेचा निषेध व्यक्त करीत आहे, असेही मयेकर यांनी म्हटले आहे.
यापूर्वीही सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या वेळी अनेक नागरिकांचा मतदानाचा अधिकार हिरावला गेला. लोकशाहीत प्रत्येकाला आपला उमेदवार निवडण्याचा अधिकार आहे. एखादा उमेदवार सर्वांनाच मान्य असेल, असे गृहित धरणे चुकीचे आहे. म्हणूनच संविधानाने मतदानाचा अधिकार दिला आहे. दुर्दैवाने, राजकीय सोयीसाठी आणि सत्तेच्या गणितांसाठी हा अधिकार वारंवार बाजूला सारला जात आहे. याचा मी तीव्र निषेध करतो, असेही मयेकर यांनी म्हटले आहे.







