मालवण (प्रतिनिधी) : मालवण एसटी आगार परिसरातील गाळ व झाडी-झुडपांनी भरलेली विहीर उपनगराध्यक्ष दीपक पाटकर आणि स्वच्छता व आरोग्य सभापती पुनम चव्हाण यांनी स्वखर्चातून स्वच्छ करून गाळमुक्त केली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे एसटी प्रशासनाकडून कौतुक करण्यात येत आहे.
एसटी आगारातील ही विहीर रोजच्या पाणी वापरासाठी तसेच बसगाड्यांच्या स्वच्छतेसाठी महत्त्वाची आहे. मात्र, गाळ आणि झाडी-झुडपांमुळे विहिरीची स्थिती अत्यंत खराब झाली होती. बसस्थानक परिसरातील पाहणीदरम्यान ही बाब उपनगराध्यक्ष दीपक पाटकर आणि सभापती पुनम चव्हाण यांच्या निदर्शनास आली.
त्यानंतर त्यांनी तातडीने पुढाकार घेत स्वखर्चाने विहिरीतील गाळ काढून संपूर्ण स्वच्छता करून घेतली. यामुळे विहिरीची पाणी साठवण क्षमता वाढण्यास मदत होणार असून आगारातील पाणीपुरवठा अधिक सुरळीत होणार आहे.
या सेवाभावी कार्याबद्दल आगार व्यवस्थापक अनिरुद्ध सूर्यवंशी यांनी दीपक पाटकर आणि पुनम चव्हाण यांचे आभार मानले.
यावेळी बोलताना दीपक पाटकर आणि पुनम चव्हाण यांनी, “जनतेची सेवा हेच आमचे पहिले कर्तव्य आहे. खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या नेतृत्वात सामाजिक बांधिलकी जपत आम्ही काम करत आहोत. मालवण शहरवासीयांच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत,” असे सांगितले.







