श्री विष्णुसहस्रनाम जप आणि १००० तुलसीपत्र समर्पणाचा अनोखा उपक्रम
संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपती अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन
श्री भरतेश्वरावर १००० शिवनामावलींनी बेलपत्र समर्पण
३ जून रोजी भाविकांना धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन
मालवण (प्रतिनिधी) :
मसुरे येथील श्री जैन भरतेश्वर मंदिरात अधिक (पुरुषोत्तम) महिन्यानिमित्त बुधवार, दि. ३ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी जैन रामेश्वर मंदिरात ब्राह्मणांच्या हस्ते श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्राचा जप करण्यात येणार आहे. तसेच नोंदणी केलेल्या भाविकांकडून श्री विष्णुसहस्रनामाच्या १००० तुलसीपत्रांचे समर्पण करण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी १ जूनपर्यंत मंदिरात शुल्कासह नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून श्री गणपती अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच श्री देव भरतेश्वरावर १००० शिवनामावलींनी बेलपत्र समर्पण करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाची सांगता दुपारी १२ वाजता श्री देव भरतेश्वरांच्या महाआरतीने होणार आहे. अधिक महिन्याच्या या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.







