देवगड : मिठमुंबरी बागवाडी समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेलेल्या पाच युवकांपैकी एक युवक समुद्रात बुडून बेपत्ता झाला असून तिघांना वाचविण्यात स्थानिक मच्छिमारांना यश आले आहे. चैतन्य राजेंद्र गुरव (२२, मूळ रा. दादर नायगाव) असे बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव आहे. तर सोहम जयेश मंडोद (२०, मूळ रा. दादर नायगाव) याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर जामसंडे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मूळ देवगड ब्राम्हणदेववाडी येथील यश राजेंद्र उपरकर हा दादर नायगाव येथे वास्तव्यास आहे. सुट्टीसाठी त्याचे मित्र ओम दीपक चव्हाण, चैतन्य गुरव, सोहम मंडोद आणि अर्णव राजेश तारी हे देवगड येथे आले होते. रविवारी सायंकाळी हे सर्वजण मिठमुंबरी बागवाडी समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले होते.
यावेळी यश उपरकर हा किनाऱ्यावर थांबला होता. तर उर्वरित चौघेजण पोहण्यासाठी समुद्रात उतरले. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने चौघेही बुडू लागले. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक रमेश तारी, लक्ष्मण तारी, मनीष तारी, बाबूराव धुरी आणि बाळा राजम यांनी तातडीने धाव घेतली.
बाबूराव धुरी आणि बाळा राजम यांनी नौकेच्या सहाय्याने समुद्रात जाऊन मदतकार्य सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे ओम चव्हाण, सोहम मंडोद आणि अर्णव तारी यांना सुरक्षित किनाऱ्यावर आणण्यात यश आले. यातील सोहम मंडोद हा बेशुद्ध अवस्थेत होता. त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास देऊन शुद्धीवर आणण्यात आले. मात्र चैतन्य गुरव हा दरम्यान समुद्रात बेपत्ता झाला.
घटनेनंतर स्थानिक मच्छिमारांनी नौकांच्या सहाय्याने समुद्रात शोधमोहीम सुरू केली. मात्र सायंकाळपर्यंत चैतन्यचा शोध लागू शकला नव्हता. दरम्यान, चिंताजनक अवस्थेतील सोहम मंडोद याला प्रथम देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी जामसंडे येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष भालेराव, उपनिरीक्षक प्रवीण सावंत आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद आचरेकर यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली.
दरम्यान, या घटनेमुळे समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पर्यटक उपस्थित असतानाही अनेकांनी बघ्याची भूमिका घेतल्याचे दिसून आले. स्थानिकांनी तत्परता दाखवून मदतकार्य केले नसते तर मोठा अनर्थ घडला असता. तसेच समुद्रकिनारी सुरक्षारक्षक नसल्याने पर्यटकांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.







