मुंबई : देशात बेरोजगारी, महागाई आणि तरुणांच्या वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक आगळावेगळा राजकीय प्रयोग सध्या चर्चेचा विषय ठरतोय… नाव आहे – ‘कॉकरोच जनता पार्टी’… होय, ऐकायला जरी हा एखादा मीम किंवा ट्रोल वाटत असला तरी, या डिजिटल पक्षाने काही तासांतच हजारो तरुणांना आपल्याकडे आकर्षित केलंय… आणि या सगळ्याची ठिणगी पडली ती सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका कथित वक्तव्यामुळे…
“बेरोजगार तरुण हे झुरळांसारखे असतात…” या कथित विधानानंतर सोशल मीडियावर संतापाचा स्फोट झाला… अनेकांनी याला तरुणांचा अपमान म्हटलं… वाद वाढल्यानंतर सरन्यायाधीशांनी स्पष्टीकरण देत ही टिप्पणी बनावट पदव्यांच्या जोरावर व्यवस्थेत घुसखोरी करणाऱ्यांसाठी होती, असं सांगितलं… मात्र तोपर्यंत सोशल मीडियावर आंदोलनाचा नवा चेहरा तयार झाला होता…
या संतापाचं रूपांतर एका उपरोधिक पण धारदार डिजिटल चळवळीत केलं ते मराठी तरुण अभिजीत डिपके यांनी… पुण्यातून पत्रकारितेचं शिक्षण घेतलेले आणि सध्या अमेरिकेतील बॉस्टन युनिव्हर्सिटीत पब्लिक रिलेशन्सचं शिक्षण घेणाऱ्या अभिजीत यांनी 16 मे रोजी ‘X’ वर ‘कॉकरोच जनता पार्टी’ची घोषणा केली… विशेष म्हणजे, अवघ्या काही तासांत या पक्षाशी 70 हजारांहून अधिक तरुण जोडले गेले…
या पक्षाचा अंदाजही हटके आहे… सदस्य होण्यासाठी बेरोजगार असणं, 24 तास ऑनलाईन राहणं, सिस्टीमवर राग काढण्याची क्षमता असणं आणि ‘प्रोफेशनल स्क्रोलर’ असणं अशा मिश्किल अटी ठेवण्यात आल्या आहेत… पण या विनोदी आवरणामागे तरुणांचा तीव्र रोष दडलेला दिसतोय…
विशेष म्हणजे या पक्षाने त्यांचा जाहीरनामाही प्रसिद्ध केला आहे… ज्यामध्ये न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, मीडिया आणि पक्षांतर यांसारख्या मुद्द्यांवर उपरोधिक पण बोचरी भूमिका मांडण्यात आली आहे… संसद आणि मंत्रिमंडळात महिलांना 50 टक्के आरक्षण, पक्षांतर करणाऱ्यांवर 20 वर्षांची बंदी, तसेच गोदी मीडियावर कारवाईसारखी आश्वासने देण्यात आली आहेत…
या डिजिटल आंदोलनाची दखल राजकीय नेत्यांनीही घेतली आहे… तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा आणि कीर्ती आझाद यांनीही या पक्षाच्या ‘स्वॅग’चं कौतुक करत मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत…
थोडक्यात सांगायचं झालं तर, ‘कॉकरोच जनता पार्टी’ ही केवळ सोशल मीडियावरील गंमत नाही… तर बेरोजगारी, महागाई आणि व्यवस्थेविषयी वाढत चाललेल्या असंतोषाचं प्रतीक बनलेली एक डिजिटल बंडखोरी आहे… जी सध्या देशभर चर्चेचा विषय ठरतेय…







