अरबी समुद्राच्या अथांग गाभाऱ्यात मंगळवारी संध्याकाळी एक ऐतिहासिक क्षण शांतपणे घडत होता…
एकेकाळी भारतीय नौदलाच्या सेवेत समुद्रावर धावणारी ‘आयएनएस गुलदार’ युद्धनौका हळूहळू समुद्रतळाच्या दिशेने झुकत होती… आणि सायंकाळी नेमके ५ वाजून ५ मिनिटांनी निवती रॉक्स परिसरात ती कायमस्वरूपी विसावली.
या क्षणासोबतच सिंधुदुर्गने भारतातील सागरी पर्यटनाच्या नव्या युगात प्रवेश केला.‘आर्टिफिशल रिफ आणि अंडर वॉटर म्युझियम’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा अंतिम टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला असून भारतासह आशिया खंडात प्रथमच निवृत्त युद्धनौका समुद्रतळाशी स्थापित करून पर्यटन आणि पर्यावरण यांचा संगम घडविणारा प्रकल्प प्रत्यक्षात उतरला आहे.
१,१२० टन वजनाची युद्धनौका समुद्रतळाशी
भारतीय नौदलातील निवृत्त आयएनएस गुलदार ही अंदाजे ८३ मीटर लांबीची आणि सुमारे १,१२० टन वजनाची युद्धनौका आहे. नौदल सेवेतून निवृत्त झाल्यानंतर या युद्धनौकेचे विशेष तांत्रिक बदल करण्यात आले. समुद्रतळाशी सुरक्षितरीत्या स्थापित करण्यासाठी जहाजातील इंधन, धोकादायक साहित्य आणि प्रदूषणकारक घटक पूर्णपणे हटविण्यात आले होते.
युद्धनौकेच्या आतील भागात नियंत्रित पद्धतीने समुद्राचे पाणी भरून ‘कंट्रोल्ड सिंकिंग ऑपरेशन’ राबविण्यात आले. जहाज समुद्रतळाशी झुकताना त्याचा समतोल कायम राखण्यासाठी तांत्रिक सेन्सर्स, मरीन बॅलन्सिंग सिस्टम आणि स्थाननिश्चिती यंत्रणा वापरण्यात आली.
२१ मीटर खोल समुद्रात स्थापना
निवती रॉक्स परिसरातील सुमारे १८ ते २१ मीटर खोलीवर ही युद्धनौका स्थापित करण्यात आली आहे. स्कुबा डायव्हिंगसाठी ही खोली आदर्श मानली जाते. भविष्यात प्रमाणित स्कुबा डायव्हर्सना समुद्रतळाशी जाऊन प्रत्यक्ष युद्धनौका पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
तज्ज्ञांच्या मते, काही वर्षांत या युद्धनौकेभोवती नैसर्गिकरित्या प्रवाळभित्ती विकसित होतील. समुद्री शैवाल, सूक्ष्मजीव आणि विविध जलचर यामुळे हा भाग कृत्रिम सागरी परिसंस्था म्हणून विकसित होईल.
समुद्र पर्यटनासह पर्यावरण संवर्धन
हा प्रकल्प केवळ पर्यटनापुरता मर्यादित नाही. समुद्रातील जैवविविधता वाढविण्यासाठी ‘आर्टिफिशल रिफ’ हा अत्यंत प्रभावी पर्याय मानला जातो. समुद्रतळाशी उभारलेली धातूची रचना अनेक माशांसाठी सुरक्षित अधिवास निर्माण करते. परिणामी मत्स्यसंपदा वाढण्यास मदत होते.तारकर्ली-देवबाग परिसर आधीच स्कुबा डायव्हिंग आणि वॉटर स्पोर्ट्ससाठी प्रसिद्ध आहे. मात्र आता ‘अंडर वॉटर वॉर म्युझियम’मुळे सिंधुदुर्गला जागतिक पर्यटन नकाशावर वेगळी ओळख मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
तांत्रिक मोहिमेवर तज्ज्ञांचे लक्ष
या मोहिमेसाठी माझगाव शिपयार्डचे अभियंते, नौदल तज्ज्ञ, मरीन इंजिनिअर्स आणि पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनेक महिन्यांपासून नियोजन केले होते. समुद्रातील प्रवाह, भरती-ओहोटी, हवामान, वाऱ्याचा वेग आणि समुद्रतळाचा अभ्यास करून अंतिम स्थान निश्चित करण्यात आले.सोमवारी रात्री युद्धनौकेत पाणी भरण्याची प्रक्रिया थांबविण्यात आली होती. मंगळवारी सकाळपासून पुन्हा ऑपरेशन सुरू करण्यात आले. जहाज हळूहळू समुद्राच्या तळाकडे झुकत असताना प्रत्येक हालचालीवर नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवण्यात येत होते.
रोजगार आणि अर्थचक्राला गती
या प्रकल्पामुळे सिंधुदुर्गातील पर्यटन उद्योगाला मोठी चालना मिळणार आहे. स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण, बोट सेवा, गाईड सेवा, हॉटेल व्यवसाय, मत्स्यव्यवसाय आणि स्थानिक पर्यटनाशी निगडित रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.
स्थानिक पर्यटन व्यावसायिकांच्या मते, गोवा आणि मालदीवप्रमाणेच सिंधुदुर्ग आता ‘मरीन अॅडव्हेंचर टुरिझम’साठी स्वतंत्र ओळख निर्माण करू शकतो.
नव्या पर्यटन पर्वाची सुरुवात
समुद्राच्या तळाशी विसावलेली ‘आयएनएस गुलदार’ आता केवळ निवृत्त युद्धनौका राहिलेली नाही…ती सिंधुदुर्गच्या समुद्री पर्यटन विकासाची नवी ओळख बनली आहे.युद्धातून पर्यटनाकडे झालेला हा प्रवास भविष्यात भारतातील सागरी पर्यटनासाठी दिशादर्शक ठरणार आहे.







