मालवण (प्रतिनिधी)
मालवण तालुक्यातील माळगाव येथे खासगी जमिनीत अतिक्रमण करून व पथ किनारी नियमांचा भंग करून माळगाव ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम सुरु केल्याची तक्रार माळगाव येथील सदर जागा मालक ग्रामस्थ सुरज श्रीकृष्ण धामापूरकर यांनी करत याप्रकरणी प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने काल सोमवार पासून मालवण तहसीलदार कार्यालयासमोर ढोल ताशा वाजंत्री उपोषण सुरु केले असून आज दुसऱ्या दिवशीही त्यांचे उपोषण सुरु होते. माळगाव ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम कायमस्वरूपी थांबवावे व न्याय मिळवून द्यावा अन्यथा तहसील कार्यालयासमोर आपण आत्मदहन करू, असा इशारा सुरज धामापूरकर यांनी दिला आहे.
माळगाव ग्रामपंचायतीच्या बांधकामाबाबत सूरज धामापूरकर यांनी गेली गेले सहा महिन्यापासून तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती, जि. प. मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारी करूनही त्यांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे त्यांनी काल सोमवारी सकाळपासून मालवण तहसीलदार कार्यालयासमोर ढोल ताशा वाजवत उपोषण सुरु केले. यावेळी त्यांचे सहकारी उपस्थित होते. मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे आणि पंचायत समिती सभापती सौ. प्रज्ञा चव्हाण यांनी धामापूरकर यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र या चर्चेमधून धामापूरकर यांना प्रशासनाकडून कोणतेही ठोस आश्वासन मिळालेले नाही.
याबाबत सूरज धामापूरकर यांनी तहसीलदार यांना निवेदन सादर केले आहे. ग्रा.पं. माळगावच्या नवीन इमारतीचे बांधकाम मालवण-बेळणे रस्त्यालगत असून पथ किनारीच्या नियमांचे भंग केलेले आहे. तसेच सा.बा. विभागाची परवांगी घेतलेली नाही. याबाबत आपण सा. बा. उपविभाग मालवण तसेच कार्यकारी अभियंता सा. बा. विभाग सावंतवाडी यांच्याकडे तक्रार केली आहे. मात्र या अनधिकृत बांधकामावर कोणतीही कारवाई झालेली नाही. माळगाव ग्रामपंचायतीने जुनी इमारत निर्लेखीत न करता नवीन इमारतीचे बांधकाम करत असल्याची तक्रार आपण ग्रामपंचायत विभाग जि. प. सिंधुदुर्ग यांच्याकडे केलेली होती मात्र त्यावरही कोणतीही कारवाई झालेली नाही. ग्रा.पं. माळगावची नवीन इमारत बांधताना पूर्वीच्या इमारतीपेक्षा वाढीव बांधकाम केलेले असल्याने सदर बांधकामांमध्ये आमच्या मालकीची खाजगी जमीन गेली आहे, याबाबत ग्रा.पं. माळगावचे सरपंच यांच्याकडे माहितीचे अधिकाराखाली मागीतलेली माहिती चुकीची व दिशाभूल करणारी असून हेतू पुरस्कृत माहिती लपवली आहे, असा आरोप धामापूरकर यांनी निवेदनात केला आहे.
जिल्हाधिकारी, जि. प. बांधकाम विभाग, तहसीलदार मालवण, प. स. मालवण, भूमी अभिलेख मालवण, सा. बा. मालवण, कार्यकारी अभियंता सा. बा. सावंतवाडी, सरपंच ग्रा. पं. माळगाव या कार्यालयाशी माहितीचा अधिकाराखाली तसेच इतर पत्र व्यवहार व तक्रारी अर्ज केलेले आहेत. मात्र मला त्यांच्याकडून कोणतीही आवश्यक माहिती मिळालेली नाही अथवा कायदेशीर कारवाई केलेली नाही. माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांवर शासकीय कार्यालयाचा अन्याय होत असून माझ्या हक्काच्या खाजगी जागेवर अतिक्रमण करून ग्रा.पं. माळगावची इमारत बळजबरीने बांधकाम करीत आहेत. याचा निषेध म्हणूनच मी उपोषणास बसलो आहे. मला माझी जागा मिळवून देईपर्यंत ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये कोणताही बदल करू नये तसेच ग्रामपंचायत इमारतीचे काम चालू करू नये, ग्रा. पं. माळगावचे अनधिकृत बांधकाम तात्काळ कायमस्वरूपासाठी थांबवावे व मला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सूरज धामापूरकर यांनी निवेदनातून केली असून माझ्या उपोषणाची दखल न घेतल्यास व तात्काळ काम न बंद केल्यास आपण तहसीलदार कार्यालयासमोर आत्मदहन करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.







