मालवण (प्रतिनिधी)
गाबीत समाजाचा गौरवशाली इतिहास आणि वर्तमानातील विविध समस्या या विषयावर हे पुस्तक अत्यंत मार्गदर्शक आणि उपयोगी ठरेल, असा विश्वास आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केला तसेच समाजाच्या सद्यस्थितीतील अडीअडचणी आणि त्यांच्या सोडवणुकीसाठी लवकरच एका सविस्तर व विस्तृत बैठकीचे आयोजन केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
विधानपरिषदेवर नवनियुक्त आमदार म्हणून निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार हे सिंधुदुर्ग दौऱ्यादरम्यान मालवण येथे आले असता गाबीत समाजातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि मान्यवरांच्या वतीने आमदार जठार यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी त्यांना ‘गाबीत समाज’ हे माहितीपूर्ण पुस्तक सप्रेम भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थित गाबीत समाजाच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी आमदार जठार यांच्याकडे आपल्या विविध मागण्या मांडल्या. आमदार जठार यांनी मंत्रालय स्तरावर गाबीत समाजाच्या प्रलंबित प्रश्नांचा व विविध विषयांचा आग्रही पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली. तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि स्थानिक समस्यांची तड लावण्यासाठी आपल्या विधानपरिषद आमदारकीच्या सभागृह अधिकारांचा प्रभावी वापर करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
या स्वागत सोहळ्याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, नगरसेविका अन्वेषा आचरेकर, नगरसेविका दर्शना कासवकर, स्वीकृत नगरसेवक रविकिरण तोरसकर, सेजल परब, पूजा सरकारे, सन्मेष परब, भाई कासवकर, दाजी सावजी, सुरेश बापर्डेकर, मनोज मेथर, आपा मालंडकर, रुपेश खोबरेकर यांसह गाबीत समाजातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







