मालवण : नागरिकांची महसूल विभागाशी संबंधित कामे वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण व्हावीत, विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले तत्काळ मिळावेत तसेच जमिनीच्या नोंदी, फेरफार, वारस नोंदी यासारख्या प्रकरणांमध्ये कोणतीही दिरंगाई होऊ नये, यासाठी महसूल कर्मचाऱ्यांनी अधिक जबाबदारीने काम करावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले.
मालवण नगरपालिका आणि मालवण महसुली मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण शहरातील रघुनाथ देसाई तालुका स्कूल सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्ष ममता वराडकर, तहसीलदार गणेश लव्हे, उपसभापती शाम झाड, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य तसेच महसूल, कृषी, आरोग्य, महावितरण आदी विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शिबिरामध्ये १५ पेक्षा अधिक महसुली सेवा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. यात ७/१२ व फेरफार उतारे, पीकपाणी नोंदी, ई-फेरफार सेवा, वारस नोंद, नाव दुरुस्ती, उत्पन्न व रहिवासी दाखले, जात प्रमाणपत्र तसेच विविध प्रमाणपत्रांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
तहसीलदार गणेश लव्हे यांनी महसूल विभागाच्या विविध योजनांची माहिती देताना शासनाच्या विविध उपक्रमांसाठी नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता अधोरेखित केली. शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविणे, जनगणना, निवडणूक आयोगाचा SIR कार्यक्रम तसेच आंबा आणि काजू नुकसान पंचनामे यांसारख्या कामांमध्ये लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते घरकुल प्रमाणपत्र, वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्याबाबतचे प्रमाणपत्र, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १५५ अंतर्गत आदेश, शिधापत्रिका, सातबारा उतारे आदी विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रकारची महसूल समाधान शिबिरे आयोजित करण्यात येत असून नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवलीचे सरपंच शाम वाक्कर यांनी केले.







