मालवण (प्रतिनिधी)
आम्ही तळाशील वासीय प्रशासन किंवा आमदार निलेश राणे यांची कोणतीही दिशाभूल करत नाही आहोत तर रेवंडी गावातील काही मुजोर वाळू माफियांकडून दोन गावात वाद निर्माण करण्याची धडपड सुरू आहे. शेलटी जेटी ते सर्जेकोट बंदर या भागात अधिकृत किंवा अनधिकृत वाळू उपसा होत असेल तर रेवंडीच्या ग्रामस्थांनी पुराव्यानिशी सिद्ध करावे, असे आव्हान तळाशील ग्रामस्थांच्यावतीने ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष संजय केळुसकर यांनी दिले आहे.
कालावल खाडीपात्रात तळाशील समोरील शेलटी जेटी ते सर्जेकोट बंदर या पट्ट्यात वाळू उपसा बंदीचा ठराव तोंडवळीच्या ग्रामसभेत घेण्यात आला. मात्र ठराव घेतल्यानंतरही सदरच्या खाडी भागात वाळू उपसा होत असून तोंडावळी तळाशील ग्रामस्थांकडून प्रशासन व आमदार निलेश राणे यांची दिशाभूल केली जात आहे असा आरोप रेवंडीच्या ग्रामस्थांनी केला होता. या पार्श्वभूमीवर तळाशील येथील श्री गोपाल कृष्ण मंदिरात तळाशील ग्रामस्थांनी आज सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन रेवंडी ग्रामस्थांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. यावेळी संजय केळूसकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य भूपाल मालंडकर, जयहरी कोचरेकर,संजय केळूसकर,समीता केळुसकर, अनुष्का जुवाटकर, जानवी पराडकर, प्राची बापर्डेकर श्वेता कोचरेकर, अजित केणी, प्रथमेश केणी, आनंद खडपकर, सुमित चोडणेकर व तळाशील मधील ग्रामस्थ व महिला आदी उपस्थित होते.
आमचे गाव समुद्र व कालावल खाडी यां दोघांच्या मध्ये असून समुद्राच्या बाजूने किनाऱ्याची धूप तसेच खाडी कडील भाग खचत चालला आहे. यामुळे आमच्या गावच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. गावाचा काही भुभाग खाडी पात्राने गिळंकृत केला आहे. आज खाडी पात्रात जे सॅन्डबार तयार झाले आहेत ते आमच्याच गावचा जो भुभाग वाहून गेल्याने तयार झाले आहे. रेवंडी गाव हे कातळ भागात असून त्यामुळे त्या गावास तळाशील सारखा धोका नाही. खाडीतील वाळू उपशामुळे तळाशील गावाला धोका निर्माण झाल्याने शेलटी जेटी ते सर्जेकोट बंदर याठिकाणी वाळू उपसा बंद करण्यासाठी आम्ही आंदोलन छेडले होते. त्या आंदोलनाला यश आले आणि या खाडी किनाऱ्यावर अधिकृत आणि अनधिकृत वाळू उपसा बंद केला आहे. यासाठी प्रशासन आणि आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त करता आहोत, असे यावेळी तळाशीलच्या ग्रामस्थांनी सांगितले.
तळाशील मधील कोणीही व्यक्ती वाळू व्यवसायाशी संबंधित नाही. आम्ही ग्रामसभेत वाळू उपसा बंदीचा ठराव मंजूर केला आहे. त्यामुळे तळाशील समोरील खाडी पात्रात कोणताही अधिकृत अथवा अनधिकृत वाळू उपसा सुरु नाही. रेवंडी ग्रामस्थ आमच्यावर चुकीचे व खोटे आरोप करून स्वतःची व आमदारांची दिशाभूल करत आहेत. रेवंडी ग्रामस्थ स्वतःच्याच गावाची बदनामी करत आहेत, खाडी पात्रात वाळू उपसा होत असल्यास रेवंडी ग्रामस्थांनी तो पकडून द्यावा आणि सिद्ध करावा, असे आव्हान यावेळी तळाशीलच्या ग्रामस्थांनी दिले.







