मालवण (प्रतिनिधी)
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मालवण शहरातील गटार व व्हाळी सफाईचे काम मालवण नगरपालिकेने हाती घेतले आहे. पावसाळ्यात शहरात कुठेही पाणी सचण्याचे प्रकार होऊ नयेत यासाठी गटार व व्हाळी साफसफाई योग्य पद्धतीने व्हावी अशी सूचना स्वच्छता व आरोग्य सभापती सौ. पूनम चव्हाण यांनी प्रशासनाला देत आपले य कामावर पूर्ण लक्ष असल्याचे स्पष्ट केले आहे.
दरवर्षी पावसाळ्यात मालवण शहरात गटारांमध्ये पावसाचे पाणी साचून बहुतेक रस्ते पाण्याखाली गेल्याचे चित्र पाहायला मिळते. मात्र चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर मागील वर्षी नगरपालिकेत लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर प्रशासकीय कारभारातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न मालवण नगरपालिकेतील सत्ताधारी गटाने सुरु केला आहे.
त्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या स्वच्छता व आरोग्य सभापती सौ. पूनम चव्हाण यांनी शहरातील गटारे व व्हाळ्या साफसफाईच्या कामावर स्वतः जातीनीशी लक्ष ठेवले असून प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना या कामावर लक्ष ठेवण्याच्या सक्त सूचना केल्या आहेत. शहरातील सर्व गटारे व व्हाळ्या मधील माती काढून पावसाच्या पाण्याला कुठेही अडथळा होणार नाही, यासाठी आपण स्वतः जबाबदारीने लक्ष ठेवून असल्याचे सौ. पूनम चव्हाण यांनी सांगितले.







