मालवण दि प्रतिनिधी
मालवण तालुक्यात बेकायदेशीर वाळू उत्खननावर महसूल प्रशासनाने एकीकडे कारवाई बडगा उचला असताना महसूल प्रशासनाच्या या कारवाईला भीक न घालता वाळूमाफियांनी बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरूच ठेवल्याने या वाळू माफियाना कुणाचाच धाक उरला नसल्याची संतप्त प्रतिक्रिया कालावल तसेच कर्ली खाडी पट्ट्यात व्यक्त होत आहे कालावल खाडीपात्रातील बांदिवडे येथील अनधिकृत वाळू उत्खननामुळे मर्डे टोकळवाडी येथील धूप प्रतिबंधक बंधारा व मसुरे बांदिवडे पुलाला धोका निर्माण झाला असल्या बाबतचे निवेदन मसुरे टोकळवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने गणेश मुणगेकर यानी प्रांताधिकारी कुडाळ यांना दिले आहे. निवेदना सोबत वाळू उपशामुळे होतं असलेल्या नुकसानीची छायाचित्रे सुद्धा जोडण्यात आली आहेत.
मर्डे ग्रामपंचायत हद्दीमधील मर्डे टोकळवाडी हे बेट असून कालावल खाडी पात्र म्हणजे गडनदीच्या किनारी वसलेल्या या बेटाला चारही बाजूने पाण्याने वेढलेले आहे. या बेटाची धूप होऊ नये याकरिता याच वाडीतील ज्येष्ठ नागरिक कै. वसंत पेडणेकर यांनी धूप प्रतिबंधक बंधारा होण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न केले होते. सन 1980 ते 85 च्या दरम्यान शासनाने टोकळवाडी हे बेट सुरक्षित राहण्यासाठी धूप प्रतिबंधक बंधारा बांधून दिला तो आजतागायत सुस्थितीत सुद्धा आहे. परंतु सध्या गडनदीमध्ये बांदिवडे भागात वाळू चोरीचे प्रमाण वाढत असून दररोज दहा ते बारा ब्रासच्या 40 ते 45 होड्यानी वाळू चोरी केली जात आहे. या चोरट्यानी शासनाच्या खनिजांची लयलूट केलेली आहे. या चोरीच्या वाळू उत्खननामुळे टोकळवाडीचा धूप प्रतिबंधक बंधारा बांधलेला आहे तो खचून जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शासनाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होणार आहे. वाळू उत्खननापूर्वी शेकडो लोकांचे मासेमारी करणे, मुळे काढणे, व ते विक्री करणे अशा प्रकारे लोकांचा रोजचा उदरनिर्वाह होत होता. परंतु वाळू चोरीमुळे रोजीरोटीचा उदरनिर्वाह बंद झालेला आहे.
तसेच वाळू उत्खननामुळे सुमारे 200 मीटर अंतरावर मसूरे बांदिवडे पूल बांधलेला आहे. त्या पुलाला सुद्धा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच वाळू काढणारे परप्रांतीय हे नदीच्या ठिकाणी आहोटीच्या वेळी शौचालयास बसतात.त्यामुळे प्रशासनाने जे उघड्यावर शौचालयास बसतात त्यांचे वर सक्त कारवाई करावी.कालावल खाडी पात्रात गड नदीमध्ये चालू असलेले वाळू चोरीचे उत्खनन पूर्णपणे थांबवून तेथे पुन्हा वाळू उत्खनन होऊ नये याबाबत संबंधितांवर तात्काळ आदेशित करावे. अनधिकृत वाळू उत्खनन होत राहिल्यास त्यामुळे गावामध्ये कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्व जबाबदारी स्थानिक प्रशासनाची राहील असे मसूरे टोकळवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने गणेश मुणगेकर यानी निवेदनात म्हटले आहे.







