मालवण दि प्रतिनिधी
चारित्र्यवान माणसाची निर्मिती करणारे मंदिर म्हणजे शाळा असते.. त्याचबरोबर एक सुजाण नागरिक निर्माण करण्याचे कामही शाळा करत असल्याने या मंदिरात मिळणारे संस्कार, शिक्षण, ज्ञान या सर्वातून विद्यार्थ्यांचे भावी आयुष्य घडत असते, खुलत असते आणि हे अमूल्य काम शंभर वर्षांपूर्वी योगात्मा डॉ. काकासाहेब वराडकर यांनी केले आणि त्यानंतर त्यांनी घालून दिलेला हा परिपाठ आजही अविरतपणे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ चालवीत आहे, असे प्रतिपादन माहिती तंत्रज्ञान वं सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी येथे बोलताना केले.
कट्टा येथे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर हायस्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालय या शाळेच्या शताब्दी महोत्सवास आजपासून प्रारंभ झाला. आज दुपारी या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय व्यंगचित्रकार आणि माजी विद्यार्थी श्री. प्रभाकर वाईरकर, वराडकर हायस्कुलचे कलाशिक्षक समीर चांदरकर, आणि आजी – माजी विद्यार्थ्यांच्या चित्र व रांगोळी प्रदर्शनाचे तसेच स्टॉलचे उदघाटन मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते झाले.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर (निवृत्त), ऍड. एस. एस. पवार तसेच संस्थेचे अध्यक्ष अजयराज वराडकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे, गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, संस्थेचे सचिव श्रीमती विजयश्री देसाई व सुनील नाईक, स्कुल कमिटीचे चेअरमन सुधीर वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर, साबाजी गावडे, महेश वाईरकर, श्रुती वराडकर, स्वाती वराडकर, आनंद टेमकर, मुख्याध्यापिका देवयानी गावडे, वराडकर इंग्लिश मिडीयम स्कुलचे मुख्याध्यापक ऋषिकेश नाईक, प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी, अविनाश जठार आदी व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री आशिष शेलार म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपले वय आणि या वयातील धडपड यांना दिशा देण्याचे काम शाळा आणि कुटुंबातील व्यक्ती करत असतात. त्यांनी दिलेल्या दिशेतून आपले भविष्य घडवायचे असते, असे सांगून ते म्हणाले, शिक्षक आणि शिक्षण व्यवस्था यातूनच विद्यार्थ्यांचे भविष्य फुलणार असल्याने, बहरणार असल्याने विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक लक्ष देत ज्ञान ग्रहण करावे आणि प्रगतीची वाट चोखाळावी असे आवाहन केले.
यावेळी मंत्री आशिष शेलार यांचा संस्थेचे विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर (निवृत्त) यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मंत्री शेलार यांनी चित्र आणि रांगोळी प्रदर्शनाचे तोंडभरून कौतुक केले.







