मालवण प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील देवली गावातील खालची परबवाडी येथे शुक्रवारी दुपारी एक अनोखी आणि धक्कादायक घटना घडली. विजय मधुकर देऊलकर यांच्या घरावर अचानक सुमारे पाच किलो वजनाचा बर्फाचा तुकडा कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
या बर्फाच्या तुकड्यामुळे घराच्या छपरावरील कौले तुटली असून एक लाकडी रिपही नुकसानग्रस्त झाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गारांचा पाऊस पडला होता. मात्र सध्या पावसाची कोणतीही शक्यता नसताना असा बर्फाचा तुकडा अचानक पडल्याने ग्रामस्थांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, विजय देऊलकर यांनी हा बर्फाचा तुकडा पुढील तपासणीसाठी फ्रीजमध्ये जतन करून ठेवला आहे. हा तुकडा गारांच्या स्वरूपातील आहे की अन्य कोणत्या कारणामुळे निर्माण झाला, याचा उलगडा होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.







