मालवण (प्रतिनिधी)
रेवंडी आणि तळाशील या दोन गावांमध्ये सुरू असलेल्या वादात रेवंडी प्रवासी जेटीवरून तळाशीलच्या मच्छिमारांकडून होणारी अनधिकृत मासे वाहतूक रोखावी, अशी मागणी रेवंडी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली असली तरी तळाशीलच्या मच्छीमारांची मासेमारी ही अनधिकृत नाही, त्यामुळे रेवंडी जेटीवरून होणाऱ्या मासे वाहतुकीस जर प्रशासनाची हरकत नसेल तर अनधिकृतपणे मासे वाहतूक रोखणे चुकीचे असून रेवंडी वासियांनी तळाशीलच्या मच्छीमारांची मासे वाहतूक रोखल्यास किनारपट्टीवरील सर्व मच्छीमार रेवंडी गावा विरोधात एकवटतील, असा इशारा महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मिथुन मालकर यांनी दिला आहे.
तळशील वासिय व मच्छीमार हे कोणत्याही प्रकारची अनधिकृत मासेमारी करत नाही. तळाशीलचे मच्छीमार रेवंडी जेटीवर अनधिकृतपणे नौका लावून मासे पकडत नाहीत, किंवा मासेमारीची जाळी जेटीवर उतरवणे असा कोणताही प्रकार करत नाहीत. तळाशीलचे मच्छिमार केवळ पकडलेली मासळी मालवणपर्यंत वाहतूक करण्यासाठी ते रेवंडी जेटीवर घेऊन जातात. हि वाहतूक अनधिकृत असेल तर प्रशासन नक्कीच ती वाहतूक रोखेल वं कारवाई करेल. मात्र प्रशासनाची कोणतीही हरकत नसताना रेवंडी गावाकडून मासळी वाहतूक अनधिकृतपणे रोखली गेल्यास किंवा मच्छिमारांना धमाकावले गेल्यास किनारपट्टीवरील मच्छिमार रेवंडी गावाविरोधात एकत्र येईल, असे मिथुन मालंडकर यांनी म्हटले आहे.
रेवंडी गावाने आपल्या मागण्या प्रशासनाकडे जरूर मांडाव्यात, त्या मान्य करून घ्याव्यात, आपल्या समस्या सोडवून घ्याव्यात याबद्दल आमचे काहीही म्हणणे नाही. मात्र चुकीच्या पद्धतीने तळाशील ग्रामस्थांची मासे वाहतूक रोखली जात असल्यास ते आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा मिथुन मालंडकर यांनी दिला आहे.







