देवगड प्रतिनिधी
कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकरी नेते राजू शेट्टी आक्रमक झाले असून सरकारच्या मदतीवर त्यांनी जोरदार टीका केली आहे. गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून सातत्याने मागणी करूनही सरकारने योग्य ती मदत न दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सरकारने जाहीर केलेली हेक्टरी २२ हजार रुपयांची नुकसानभरपाई अत्यंत अपुरी असून “कलमाला केवळ २२० रुपये” मिळत असल्याने हा कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा सरळ अपमान असल्याची टीका शेट्टी यांनी केली. “ही मदत नसून भीक आहे,” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.
शेट्टी यांनी सरकारवर आणखी एक गंभीर आरोप करत सांगितले की, या परिस्थितीचा फायदा घेत काही औषध विक्रेत्या कंपन्यांकडून बंदी घातलेली व निकृष्ट दर्जाची बोगस औषधे शेतकऱ्यांना विकली जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान अधिक वाढत आहे.
दरम्यान, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या बैठकीत व्यापाऱ्यांनाही स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या बागांना आंबा आलेला नाही, त्यांनी घेतलेल्या अॅडव्हान्सवर व्याज आकारणे किंवा वसुलीसाठी तगादा लावल्यास कठोर कारवाई आणि आंदोलन छेडले जाईल, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले.
हा लढा अद्याप संपलेला नसून पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी ११ एप्रिल रोजी सिंधुदुर्गमधील देवगड-जामसंडे येथे दुपारी ४ वाजता आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
“२२ हजारांची भीक घ्यायची नाही. सरकारला भिकेला लावल्याशिवाय आणि व्यापारी व औषध विक्रेत्यांना वठणीवर आणल्याशिवाय मागे हटायचे नाही,” असा निर्धार व्यक्त करत मोठ्या संख्येने मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







