अक्षय तृतीया निमित्त ‘अनाम प्रेम परिवार’चा उपक्रम; देशभरातील सहभागींची उपस्थिती
क्रिकेट, सागरी सफर, कार्यशाळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
मालवण (प्रतिनिधी):
मालवण येथे ‘अनाम प्रेम परिवार’तर्फे अंध व दृष्टिबाधित बांधवांसाठी ‘अक्षय तृतीया २०२६’ निमित्त राष्ट्रीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा १७ ते १९ एप्रिल या कालावधीत कुंभारसाठ येथील हॉटेल जानकी येथे पार पडणार आहे.
या मेळाव्यात देशभरातील अंध व दृष्टिबाधित विद्यार्थी सहभागी होणार असून, प्रेम, आपुलकी आणि एकात्मतेचा अनुभव देणारा हा उपक्रम ठरणार आहे.
कार्यक्रमाच्या रूपरेषेनुसार, शुक्रवार दि. १७ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत टोपीवाला हायस्कूल मैदान येथे दृष्टिबाधित मुलांचे क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले आहेत. त्यानंतर दुपारी ३ वाजल्यापासून कार्यशाळा होणार आहे.
शनिवार दि. १८ एप्रिल रोजी सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत सहभागींसाठी सागरी सफर व पर्यटनाचे आयोजन करण्यात आले असून, दुपारी ३ नंतर विविध खेळ व स्पर्धा घेतल्या जाणार आहेत.
रविवार दि. १९ एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत मुख्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून, अधिक माहितीसाठी मिलिंद अवसरे (९४२३८३२८११), एलिझा पिंटो, संदीप खानोलकर, प्रशांत भाट, संजना मेस्त्री, प्रेरणा मेस्त्री यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.







