मालवण (प्रतिनिधी):
तळाशील परिसरातील कालावल खाडीत सुरू असलेल्या ग्रामस्थांच्या आंदोलनाने आता वेगळेच आणि अधिक तीव्र वळण घेतले आहे. गेले सात दिवस सुरू असलेल्या या आंदोलनाकडे जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने संतप्त झालेल्या गावातील सुमारे ६० ते ७० महिलांनी आज थेट खाडीच्या पाण्यात उतरून आंदोलन छेडले.
एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला खाडी अशा भौगोलिक स्थितीत असलेल्या तळाशील गावासाठी खाडीकिनाऱ्याची जमीन अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, रेवंडीसमोरील खाडीपात्रात सुरू असलेल्या अनधिकृत वाळू उपशामुळे ही जमीन मोठ्या प्रमाणात खचत चालली असून, त्यामुळे संपूर्ण गावच नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
शेलटी ते रेवंडी दरम्यान सुरू असलेला वाळू उपसा तात्काळ बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, ही ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे. मात्र महसूल, बंदर व पोलीस प्रशासनाकडून याबाबत कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याने आंदोलन अधिकच चिघळले आहे.
दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास खाडीत उड्या घेऊन जीवन संपवण्याचा गंभीर इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. कालावल खाडीपात्रात काही ग्रामस्थ होड्यांमध्ये बसून तर काही किनाऱ्यावर ठिय्या आंदोलन करत असून, आज महिलांनी पाण्यात उतरल्याने या आंदोलनाची तीव्रता शिगेला पोहोचली आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याची गरज व्यक्त होत आहे.







