भंडारी एज्युकेशन सोसायटीच्या कनिष्ठ महाविद्यालयात माजी विद्यार्थी तसेच प्रसिद्ध मालवणी कवी रुजरिओ पिंटो (बाबला पिंटो) यांचे प्रेरणादायी व्याख्यान उत्साहात पार पडले.
“मी कसा घडलो” या विषयावर बोलताना पिंटो यांनी आपल्या आयुष्यातील विविध प्रेरणादायी प्रसंग उलगडून दाखवले. व्यसनापासून दूर राहिल्यामुळेच समाजात विविध क्षेत्रांत काम करण्याची संधी मिळाली आणि मान-सन्मान मिळाला, असे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांनीही आपल्या आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या व्यसनाच्या आहारी जाऊ नये, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली.
कार्यक्रमादरम्यान त्यांनी आपल्या खास शैलीत मालवणी कविता सादर करत विद्यार्थ्यांची मने जिंकली.
या कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच प्राचार्य आणि प्राध्यापक वर्गाचीही उपस्थिती लाभली.







