मालवण (प्रतिनिधी):
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या सागरी राजधानी किल्ले सिंधुदुर्गचा ३५९ वा वर्धापन दिन “जय भवानी, जय शिवाजी”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशा गगनभेदी घोषणांच्या निनादात उत्साहपूर्ण व ऐतिहासिक धाटणीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. मालवण तालुक्यातील वायरी येथील मोरयाचा धोंडा तसेच किल्ले सिंधुदुर्ग परिसरात शिवभक्तांची मोठी उपस्थिती लाभली होती.
किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती व शिवप्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळच्या शुभमुहूर्तावर वायरी येथील मोरयाचा धोंडा येथे माजी नगरसेवक रविकिरण आपटे यांच्या पौरोहित्याखाली नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते विधिवत गणेशपूजन संपन्न झाले. त्यानंतर मोरेश्वर चरणी गाऱ्हाणे घालून स्वराज्याच्या मंगल कार्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
या प्रसंगी प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे, उपाध्यक्ष डॉ. ज्योती तोरसकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, नगरसेवक ललित चव्हाण, रविकिरण तोरस्कर, तपस्वी मयेकर, वायरी भूतनाथचे सरपंच भगवान लुडबे, पंचायत समिती उपसभापती श्याम झाड यांच्यासह अनेक मान्यवर व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर किल्ले सिंधुदुर्गावरील हनुमान मंदिरात भक्तिभावाने हनुमान स्तोत्र पठण करण्यात आले. पुढे श्री शिवराजेश्वर मंदिर येथे जाऊन छत्रपतींना अभिवादन करण्यात आले. यावेळी अनिकेत फाटक यांनी अर्पण केलेले हापूस आंबे महाराजांच्या चरणी अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली, तर गुरुनाथ राणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून स्वराज्याच्या स्मृतींना वंदन करण्यात आले.
याचवेळी मोरयाचा धोंडा लवकरात लवकर संरक्षित व्हावा, अशी भावपूर्ण प्रार्थना करण्यात आली. उपस्थित शिवप्रेमींनी शिवप्रतिज्ञा घेऊन स्वराज्याच्या मूल्यांचे जतन करण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाचा पुढील भाग मर्दानी परंपरेच्या साक्षीने रंगला. वायरी येथील सांस्कृतिक लोककला क्रीडा मंडळाच्या कलाकारांनी मर्दानी खेळांची नेत्रदीपक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांमध्ये उत्साहाची लहर निर्माण केली. अजित आंबेरकर, सचिन आंबेरकर, केतन आजगावकर, आकाश आंबेरकर, पुष्कर आंबेरकर, ऋषिकेश पाटील, नितेश पाटील आणि अरुण भगत यांनी सादर केलेल्या पराक्रमी खेळांनी शिवकालीन शौर्याची आठवण ताजी केली.
समारोपप्रसंगी अध्यक्ष गुरुनाथ राणे व उपाध्यक्ष सौ. ज्योती तोरसकर यांनी सर्व शिवप्रेमींना आवाहन करताना, “दरवर्षी अशाच एकजुटीने एकत्र येऊन किल्ले सिंधुदुर्गचा वर्धापन दिन साजरा करून स्वराज्याच्या परंपरेचा जागर कायम ठेवावा,” असे सांगितले.
शिवभक्तांच्या जयघोषात दुमदुमलेला हा सोहळा स्वराज्याच्या तेजस्वी इतिहासाची जणू पुनःप्रत्ययकारी झलक ठरला.







